सकाळी धर्मराव बाबा आत्रामांची शरद पवारांना गळ, दुपारी पवारांकडून लोकसभेचा शब्द!

| Updated on: Nov 18, 2021 | 7:51 PM

पुढच्या निवडणुकीत धर्मराव बाबांना लोकसभेला पाठवायचं आणि भाग्यश्रीला विधानसभेत निवडून द्यायचं. सरकार बनल्यानंतर जिल्हा परिषदेचा अनुभव असल्यामुळे भाग्यश्री यांना अधिक काम करण्याची संधी राज्य पातळीवर द्यावी, अशी पक्षाची इच्छा आहे. त्याला इथल्या जनतेची साथ मिळेल, अशी आशा करतो', अशा शब्दात पवार यांनी भविष्यातील दिल्लीवारीवर शिक्कामोर्तब केलंय.

सकाळी धर्मराव बाबा आत्रामांची शरद पवारांना गळ, दुपारी पवारांकडून लोकसभेचा शब्द!
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us on

गडचिरोली : माजी राज्यमंत्री आणि गडचिरोलीतील विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर मोठी घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. ‘ही विधानसभा शेवटची’ अशी घोषणा करत आत्राम यांनी भविष्यात दिल्लीत नेण्याची गळ पवारांना घातली होती. आत्राम यांच्या मागणीला आता शरद पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळत आहे. (Sharad Pawar hints to give ticket to Dharmarao Baba Atram in upcoming Lok Sabha elections)

‘राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. आमची इच्छा होती की, विदर्भात राष्ट्रवादीला कमीत कमी तीन मंत्री तरी मिळावेत. पण आम्हाला ते मिळू शकले नाहीत, कारण जागा कमी होत्या. आमची इच्छा ही होती की तिसरी जागा धर्मरावबाबा आत्राम यांना द्यावी. याआधी त्यांनी उत्तम काम केलेय. पण जागा कमी असल्यामुळे त्यांना जागा देता आली नाही, हे दुःख आमच्या मनात आहे. ते दुःख आम्ही कधी ना कधी दूर करु. पुढच्या निवडणुकीत धर्मराव बाबांना लोकसभेला पाठवायचं आणि भाग्यश्रीला विधानसभेत निवडून द्यायचं. सरकार बनल्यानंतर जिल्हा परिषदेचा अनुभव असल्यामुळे भाग्यश्री यांना अधिक काम करण्याची संधी राज्य पातळीवर द्यावी, अशी पक्षाची इच्छा आहे. त्याला इथल्या जनतेची साथ मिळेल, अशी आशा करतो’, अशा शब्दात पवार यांनी भविष्यातील दिल्लीवारीवर शिक्कामोर्तब केलंय.

येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेच्या जागांपैकी 50 टक्के जागांसाठी सर्वसाधारण कुटुंबातील महिलांना संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण करून द्यावा, असं आवाहनही पवार यांनी गडचिरोलीकरांना केलंय.

धर्मराव बाबा आत्राम कोण आहेत?

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा एक मध्यबिंदू मानला जातो. या विधानसभेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम चार वेळा निवडून आले आहेत. आघाडी सरकारमध्ये ते मंत्री होते. अहेरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र तिथे खिंडार पडल्यानंतर धर्मराव बाबांचा एकदा अपक्ष दीपक आत्राम आणि दुसऱ्यांदा पुतणे आणि भाजप उमेदवार अंबरीश आत्राम यांनी पराभव केला होता. मात्र 2019 मध्ये धर्मराव बाबांनी पुन्हा निवडणूक जिंकली.

पवारांना हिऱ्याच्या काट्यांचं घड्याळ

दरम्यान वडसा येथे शरद पवार यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी शरद पवार यांना हिऱ्याचे काटे असलेले हिऱ्याची घड्याळ भेट दिले. त्यासोबत लाकडावर कोरलेली संविधानाची प्रस्ताविकाही त्यांनी पवारांना भेट दिली.

इतर बातम्या :

‘इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, तिकडे आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी’, अतुल भातखळकरांची खोचक टीका

‘पवार म्हणाले मध्यममार्ग काढा, पण पवारांचा मध्यमार्ग पूर्वेला, दक्षिणेला की उत्तरेला?’ सदाभाऊ खोतांचा खोचक सवाल

Sharad Pawar hints to give ticket to Dharmarao Baba Atram in upcoming Lok Sabha elections