…या तर चोराच्या उलट्या बोंबा; किशोर पाटील यांचा अजित पवारांवर पलटवार!

सध्या आनंदाची शिधा वाटपावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

...या तर चोराच्या उलट्या बोंबा; किशोर पाटील यांचा अजित पवारांवर पलटवार!
| Updated on: Oct 23, 2022 | 9:31 AM

मुंबई : सध्या आनंदाची शिधा वाटपावरून वातावरण चांगलचं तापलं आहे. राज्य सरकारच्या (State Govt) वतीने दिवाळीनिमित्त गरजुंना शंभर रुपयांमध्ये वस्तुंचे वाटप होते. ज्यामध्ये साखर, तूप, तेल, गूळ आणि डाळ यांचा समावेश आहे. मात्र यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तसेच या कीटच्या माध्यमातून प्रचार सुरू असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. विरोधकांच्या या आरोपाला शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी नाव न घेता विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला आहे.

काय म्हटलं किशोर पाटील यांनी?

किशोर पाटील यांनी नाव न घेता अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  भ्रष्टाचाराच्या आरोपाला उत्तर देताना किशोर पाटील यांनी म्हटलं आहे की, मला असं वाटतं या चोराच्या  उलट्या बोंबा आहेत. स्वत: काही करायचं नाही आणि राज्यकर्ते करतात तर त्यांच्यावर टीका करायची. मी पिंपळगाव हरेश्वरला जाऊन किटचं वाटप करून कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. तिथले गरजू लोक समाधानी होते. तुम्ही एकदा गोर गरिबांमध्ये फिरा म्हणजे तुम्हाला कळेल, असं पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, गरिंबाना दिवाळी गोड करण्यासाठी शंभर रुपयांत साखर , दाळ, गुळ,  तूप, तेल या वस्तू मिळत आहेत. आणि तुम्ही म्हणता त्यामध्ये भ्रष्टाचार होतो. या किटवर शंभर रुपये छापील किंमत आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे की आम्ही 100 रुपयांत गरिबांना वस्तुचे वाटप करत आहोत. मग यात भ्रष्टाचार कुठे झाला असा सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच विरोधकांना आटा मिळत नाही म्हणून त्यांच्याकडून आरोप करण्यात येत आहेत, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.