तर… दोन जागा अधिक आल्या असत्या भाजपनं गणित मांडलं, गुलाबराव पाटलांनी निकाल लावला, दिलं जशास तसं उत्तर

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने समन्वय ठेवला असता तर दोन जागा अधिक जिंकता आल्या असत्या, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. या आरोपावर गुलाबराव पाटील यांनी काय उत्तर दिलं? महायुतीतील समन्वयाबाबत त्यांनी नेमकं काय सांगितलं?

तर... दोन जागा अधिक आल्या असत्या भाजपनं गणित मांडलं, गुलाबराव पाटलांनी निकाल लावला, दिलं जशास तसं उत्तर
Maharashtra Legislative Council Election
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 29, 2026 | 7:47 PM

विधानपरिषद निवडणुकीतील महायुतीतील समन्वय, संजय राऊत यांची टीका आणि जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीवरून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. विधानपरिषद निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांमध्ये पक्षापेक्षा उमेदवाराची प्रतिमा आणि त्याचा प्रभाव महत्त्वाचा असतो, असे गुलाबराव पाटील म्हणाले. महायुतीत काही दुरावा निर्माण झाला असेल, तर तो दूर करण्याचा अधिकार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडे नसून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या जागेचा शिवसेनेने बदला घेतल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना, आमचे 237 आमदारांचे भक्कम सरकार असल्याने व्यक्तिगत किंवा राजकीय बदला घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

महायुतीला आत्मचिंतनाची गरज असल्याच्या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लगावला. “संजय राऊत यांनी आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे. त्यांच्याकडे अजून आत्मा शिल्लक आहे का, हे तपासावे आणि मगच चिंतनाच्या गोष्टी कराव्यात,” अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.

Loading...

जळगाव महापालिकेच्या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींना वेळेवर निमंत्रण दिले जात नसल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. या कार्यक्रमासाठी सर्वांना दोन दिवस आधीच निमंत्रित करण्यात आले होते. नगरसेवक, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, खासदार, आमदार आणि मंत्री उपस्थित असून, जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण एकजुटीने कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपच्या विरोधात काम केल्याच्या आरोपावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. हा विषय आपल्या अखत्यारीतील नसून, तिथे नेमके काय घडले याची पुरेशी माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत स्थानिक नेतेच अधिकृतपणे बोलू शकतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. अर्ज दाखल केल्यानंतर माघारीसाठी जवळपास 18 दिवसांची मुदत असते. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांना अर्ज भरण्यापासून रोखता येणार नाही. अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीतील तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून जागावाटपाचा तोडगा काढतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज

जळगाव जिल्हा बँकेचा एनपीए 59 टक्के असल्याचा उल्लेख करत, बँकेचे हित जपण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांनी आपसात लढण्याऐवजी एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले. युती झाल्यास कार्यकर्त्यांमधील वाद मिटवता येतील आणि बँकेचे हितही जपता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us