डिपॉझिटसाठी दहा हजारांचे चिल्लर, उमेदवाराला दंड, दंड भरताना पुन्हा चिल्लर

| Updated on: Oct 01, 2019 | 8:44 AM

डिपॉझिट भरण्यासाठी दहा हजारांचे चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीतून आणल्यामुळे नेवासामध्ये विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेल्या मच्छिंद्र मुंगसे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

डिपॉझिटसाठी दहा हजारांचे चिल्लर, उमेदवाराला दंड, दंड भरताना पुन्हा चिल्लर
Follow us on

शिर्डी : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या उमेदवारालाच दंड करण्यात आला आहे. डिपॉझिट भरण्यासाठी दहा हजारांचे चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीतून आणल्यामुळे (Shirdi Candidate Fine) त्याच्यावर कारवाई करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात उमेदवाराकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तेव्हा दंड भरतानाही पठ्ठ्याने सुटी नाणीच दिली.

एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना दंड होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असावी. नेवासा तालुक्यातील देवगावमध्ये राहणाऱ्या मच्छिंद्र देवराव मुंगसे यांच्यावर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. मच्छिंद्र देवराव मुंगसे यांना शिर्डी मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

शिवसेनेकडून या सात जागांवर वेट अँड वॉच, इच्छुक एबी फॉर्मसाठी ‘मातोश्री’वर

अर्ज भरताना अनामत रक्कम मुंगसे यांनी दहा हजार रुपयांची चिल्लर (Shirdi Candidate Fine) आणली होती. ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात मकरंद अनासपुरे यांनी साकारलेली व्यक्तिरेखा निवडणुकीचा अर्ज भरताना दहा हजारांचे चिल्लर डिपॉझिट म्हणून घेऊन गेल्याचं दाखवलं आहे. सुटे पैसे मोजताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आल्याचंही ‘सिनेमॅटिक’ पद्धतीने दाखवलं होतं. त्यानंतर विविध निवडणुकांच्या वेळी उमेदवार चिल्लर नेण्याची स्टंटबाजी करताना दिसले.

प्लास्टिक बंदी असतानाही अनामत रक्कम ही प्लास्टिकमध्ये आणल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी समीर शेख यांनी पाहिलं. प्लास्टिक बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप करत मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला.

दंड भरतानाही मुंगसे यांनी एक हजार रुपयांच्या चिल्लरसह पाच हजार रुपये भरले आणि दंडाची पावती घेतली. अहमदनगरमध्ये नेवासा नगरपंचायत असूनही आतापर्यंत इथे प्लॅस्टिकविरोधी कारवाई फारशी झालेली नव्हती. आता उमेदवाराकडून अशाप्रकारचा दंड वसूल झाल्यामुळे सर्वांचे डोळे विस्फारले आहेत.