गोव्यात ‘रात्रीस खेळ चाले!’, शिवसेनेचा भाजपवर निशाणा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच गोव्यात सत्तेची गणिते मांडली गेली. एवढेच नव्हे, गोव्याचा मुख्यमंत्री ठरवून, मध्यरात्रीच भाजपने शपथविधीही आटोपला. या सगळ्या घटनाक्रमावर लोकसभा निवडणुकीत युती केलेल्या मित्रपक्ष शिवसेनेने ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी गोव्यात जे काही झाले, त्या प्रकाराला शिवसेनेने ‘रात्रीस खेळ चाले’ असे म्हटले आहे. या […]

गोव्यात रात्रीस खेळ चाले!, शिवसेनेचा भाजपवर निशाणा
Follow us on

मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच गोव्यात सत्तेची गणिते मांडली गेली. एवढेच नव्हे, गोव्याचा मुख्यमंत्री ठरवून, मध्यरात्रीच भाजपने शपथविधीही आटोपला. या सगळ्या घटनाक्रमावर लोकसभा निवडणुकीत युती केलेल्या मित्रपक्ष शिवसेनेने ‘सामना’तून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सत्तेसाठी गोव्यात जे काही झाले, त्या प्रकाराला शिवसेनेने ‘रात्रीस खेळ चाले’ असे म्हटले आहे. या अग्रलेखावरुन आता शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी उडण्याची शक्यता आहे.

‘सामना’त नेमकं काय म्हटलंय?

“फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली. गोव्यात हे सर्व रात्री घडले. ‘रात्रीस खेळ चाले’ या राजकीय मालिकेचे चित्रीकरण जणू मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाच्या साक्षीने सुरू होते. चिता पेटत होती व सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती. निदान चार तास थांबायला हरकत नव्हती, पण सकाळपर्यंत काँग्रेसने ढवळीकर, सरदेसाईंना गळाला लावले तर काय करायचे? या भयातून रात्रीच खेळ उरकून टाकला गेला. गोव्याची जनता तरी हतबलतेशिवाय काय करणार? आम्ही फक्त सहानुभूतीचा उसासा सोडू शकतो.” असे ‘सामाना’तून शिवसेनेने म्हटले आहे.

विजय सरदेसाई आणि सुदीन ढवळीकरांवर टीका

“विजय सरदेसाई किंवा मगोचे सुदिन ढवळीकर यांच्या भूमिका व निष्ठा संशयास्पद आहेत. रात्रीच्या अंधारातच नव्हे तर दिवसाढवळय़ा नवा डाव मांडायला ते मागेपुढे पाहणार नाहीत.” असे म्हणत शिवसेनेने सरदेसाई आणि ढवळीकरांच्या निष्ठेवर शंका घेतली आहे.

तसेच, “ढवळीकर यांना जसे एकदा मुख्यमंत्री व्हायचे आहे, तसे विजय सरदेसाई यांनाही व्हायचे आहे. भाजपास नव्याने पाठिंबा हवा असेल तर आमच्या तीनही आमदारांना मंत्री करा, अशी अट ढवळीकर यांनी टाकली व शेवटी स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेऊन त्यांचा बंडोबा थंडोबा झाला. विजय सरदेसाई यांचा कांगावा असा की, ‘आमचा पाठिंबा फक्त पर्रीकरांना होता, भाजपास नव्हता. त्यामुळे मला मुख्यमंत्री करा.’ पण सरदेसाई यांनीही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे.”, असे म्हणत शाब्दिक वारही ‘सामना’तून करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद न दिल्याने शिवसेनेची खंत?

“आमच्या कोणत्याही राज्यात उपमुख्यमंत्रीपद नसेल, असे चार वर्षांपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केले होते व महाराष्ट्रात शिवसेनेस उपमुख्यमंत्रीपद मिळू दिले गेले नाही. मात्र नंतर बिहारात एक, उत्तर प्रदेशात दोन उपमुख्यमंत्री नेमण्यात आले. जम्मू-कश्मीरातही भाजपने उपमुख्यमंत्रीपद घेतले व आता फक्त 19 आमदारांच्या बहुमतासाठी दोन उपमुख्यमंत्रीपदे बाहेरच्यांना देऊन गोव्यात सत्ता टिकवावी लागली.” असे म्हणत महाराष्ट्रात उपमुख्यममंत्रिपद न मिळाल्याची खंतही शिवसेनेने ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केली आहे.