संजय राऊत अचानक लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार

| Updated on: Nov 11, 2019 | 4:45 PM

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेतील महत्त्वाचा चेहरा असलेलेशिवसेना खासदार संजय राऊत अचानक लीलावती रुग्णालयात (Sanjay Raut lilavati hospital) दाखल झाले आहेत.

संजय राऊत अचानक लीलावती रुग्णालयात दाखल, अँजिओग्राफी होणार
Follow us on

मुंबई :  महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेतील महत्त्वाचा चेहरा असलेलेशिवसेना खासदार संजय राऊत अचानक लीलावती रुग्णालयात (Shiv Sena leader Sanjay Raut admitted at Lilavati hospital) दाखल झाले आहेत. संजय राऊत (Sanjay Raut lilavati hospital) हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीला उपस्थित होते. वांद्रे येथील हॉटेल ताज लँड इथं ही बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवार वाय बी चव्हाण सेंटर तर उद्धव ठाकरे मातोश्रीवर रवाना झाले. मात्र संजय राऊत हे थेट लीलावती रुग्णालयात गेले.

संजय राऊत यांना प्रकृतीचा त्रास होत असल्याने ते थेट रुग्णालयात गेले.  त्यांना अस्वस्थ वाटू लागत असल्याने रुग्णालयात जावं लागलं. संजय राऊत यांच्यावर आज रात्री 8 वाजता अँजिओग्राफी होणार आहे. डॉ अजित मेनन हे अँजिओग्राफी करणार आहेत. त्या रिपोर्ट्सनंतर ठरवलं जाईल की अँन्जॉप्लास्टी करायची की नाही. अँन्जॉप्लास्टी करायचा निर्णय झाल्यास डॉ. मॅथ्यू ती करतील. राऊत सध्या 11 मजल्यावर विशेष कक्षात आहेत.

सध्या त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू सुनील राऊत, कुटुंबातील सदस्य प्रवीण राऊत, सुजित पाटकर तसेच शिवसेना पदाधिकारी भाऊसाहेब चौधरी, संजय सावंत आहेत.

चार दिवसांपूर्वी राऊत यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीखाली आहेत.

ताण हे प्रकृती अस्वस्थाचे मुख्य कारण सांगितले जात आहे. पुढचे 2 दिवस ते लीलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असतील.

गरज पडल्यास अँजिओग्राफी : सुनील राऊत
दरम्यान, बंधू सुनील राऊत यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना, घाबरण्यासारखं काही नाही, केवळ रुटिन चेकअपसाठी गेल्याचं सांगितलं. गेल्या 15 दिवसातून त्यांना छातीत दुखत होतं. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळू शकेल, असं सुनील राऊत म्हणाले.

“संजय राऊत यांना रुटीन चेकिंगसाठी अॅडमिट केलं आहे. उद्यापर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळायला हवा. अँजिओग्राफी करायची की नाही हे संध्याकाळपर्यंत कळेल, त्यानंतर पुढचा निर्णय होईल. सिरीयस मॅटर नाही. रुटिन चेकअपसाठी गेले आहेत”, असं संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी सांगितलं.

अँजिओग्राफी म्हणजे काय?

हृदयविकाराच्या आजाराचे निदान करण्यासाठी जी चाचणी केली जाते त्याला अँजिओग्राफी म्हणतात. हृदयविकार आहे की नाही हे या चाचणीतून स्पष्ट होतं. त्यानंतर उपचाराची दिशा ठरवली जाते.  ही चाचणी सोपी, सुरक्षित आणि पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होणारी आहे. रुग्ण पूर्णवेळ जागा असतो  केवळ लोकल अॅनेस्थेशियाच्या खाली ही चाचणी केली जाते. इतकंच नाही तर या तपासणीदरम्यान डॉक्टर रुग्णाशी संवादही साधत असतो.

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदा

संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत. गेल्या दहा दिवसांपासून ‘सामना’चे अग्रलेख, ट्वीट आणि पत्रकार परिषद हा संजय राऊत यांचा सकाळचा शिरस्ता. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत भाजपचा समाचार घेताना दिसत आहेत.

शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यात शिवसेनेची तोफ रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांना ताण जाणवत होता. ताज लँड्स एन्डमधील चर्चेनंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. त्यामुळे ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. उद्या आणि परवाचा दिवस ते रुग्णालयात दाखल असतील, अशी माहिती आहे.

भाजपवर टीका

संजय राऊत यांनी भाजपला टीकेचं लक्ष्य केलं होतं. भाजप साम, दंड, भेद वापरून सत्तेसाठी सरकारी यंत्रणांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. ‘गोड बातमी काय आहे पाहावं लागेल. कोण कुठे जन्माला आलं आहे का, कुठे पेढे वाटायचे आहेत का, लग्नाच्या पत्रिका द्यायच्या आहेत का?’ अशा शब्दात राऊतांनी मुनगंटीवार यांच्यावरही टीका केली होती.

पत्रकार परिषदेत टीका

राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी 72 तासांची मुदत दिली होती. मात्र आम्हाला फक्त 24 तासांची मुदत का दिली? असा सवाल संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. राज्याला राष्ट्रपती राजवटीमध्ये ढकलण्यासाठी प्रयत्न होत आहेत, अशी टीका राऊत यांनी सकाळी केली होती. तर ‘रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी………!’ असं सूचक ट्वीटही त्यांनी आज केलं होतं.