‘शशिकांत शिंदे आणि मी एकच’, जावळीच्या सरपंच परिषदेत शिवेंद्रसिंहराजेंची पुन्हा फटकेबाजी

| Updated on: Feb 18, 2021 | 9:07 PM

गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे (Shivendraraje Bhosale on Shashikant Shinde in Jawali).

शशिकांत शिंदे आणि मी एकच, जावळीच्या सरपंच परिषदेत शिवेंद्रसिंहराजेंची पुन्हा फटकेबाजी
Follow us on

सातारा : जावळी तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा गुरुवारी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील हे उपस्थित राहणार होते. पण शिवेंद्रराजे सोडले तर इतरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली (Shivendraraje Bhosale on Shashikant Shinde in Jawali).

गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रसिंहराजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. शिवेंद्रसिंहराजे यांनी आज झालेल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा फटकेबाजी केली. त्यांनी शशिकांत शिंदेंना उद्देशून “शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहीत नाही. त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी आपल्या तिघांनाही कळत असतं”, असं वक्तव्य केलं (Shivendraraje Bhosale on Shashikant Shinde in Jawali).

काही दिवसांपूर्वी शिवेंद्रसिंहराजे यांनी जावळीतीलच एका कार्यक्रमात शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. पण त्यावर शशिकांत शिंदे यांनी मी सर्व पक्ष वाढीसाठी करत असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आज अचानक शिवेंद्रराजे यांनी आपण दोघे एकच आहोत, असे विधान करून पुन्हा एकदा राजकीय धुरळा उडवून दिला आहे. यामागे शिवेंद्रसिंहराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी (17 फेब्रुवारी) झालेली भेट असण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्यातील वादाची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच शिवेंद्रराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात, ‘मी उदयनराजेंच्या विरोधात निवडणूक लढवून निवडून आलेला माणूस आहे. समोरच्याची वाट लागल्याशिवाय गप्प बसत नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा रोख शशिकांत शिंदे यांच्या दिशेने असल्याची चर्चा होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनीही शिवेंद्रराजे यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर शिवेंद्रसिंह राजे यांनी शशिकांत शिंदे आणि शिंदे साहेब तुम्ही आणि मी एकच आहोत हे बाहेरच्यांना माहीत नाही, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

शिवेंद्रराजे कोण आहेत ?

शिवेंद्रराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपप्रवेश केला. त्यानंतर भाजपच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले. (Shivendraraje Bhosle slams Shashikant Shinde referring Udayanraje)

शिवेंद्रराजे आणि उदयनराजे हे चुलतबंधू. मात्र गेल्या काही काळात दोघांमध्येही विस्तव जात नव्हता. आधी दोघंही राष्ट्रवादीत होते, नंतर दोघंही भाजपात गेले. भाजपप्रवेशाच्या वेळी दोन्ही राजेंचं मनोमीलन झाल्याचं पाहायला मिळालं.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे राष्ट्रवादीच्या तिकीटावर सलग चार वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. दोन वेळा जावळी, तर दोन वेळा कोरेगाव मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. सध्या ते विधानपरिषदेवर आमदार आहेत.

हेही वाचा : अहो आश्चर्यम… लग्नकार्यात शिवेंद्रराजे आणि शशिकांत शिंदे एकमेकांच्या शेजारी बसतात तेव्हा…..