निवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर

| Updated on: May 28, 2019 | 10:32 PM

मुंबई : निवडणूक लढवायला हिंमत लागते असं म्हणणाऱ्या माजी खासदार निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाने उत्तर दिलंय. माणूस पराभवाने आणि आपल्या परिवाराची संपलेली कारकीर्द पाहून किती भरकटू शकतो याचं हे उदहारण आहे. हिंमत असेल तर आमच्याविरोधात उभे राहून दाखवा, पुन्हा हरवायला आवडेल, असं उत्तर नगरसेवक अमेय घोले यांनी दिलंय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निलेश राणेंनी […]

निवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर
Follow us on

मुंबई : निवडणूक लढवायला हिंमत लागते असं म्हणणाऱ्या माजी खासदार निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाने उत्तर दिलंय. माणूस पराभवाने आणि आपल्या परिवाराची संपलेली कारकीर्द पाहून किती भरकटू शकतो याचं हे उदहारण आहे. हिंमत असेल तर आमच्याविरोधात उभे राहून दाखवा, पुन्हा हरवायला आवडेल, असं उत्तर नगरसेवक अमेय घोले यांनी दिलंय.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निलेश राणेंनी एक ट्वीट केलं होतं. ज्यात ते म्हणाले होते की निवडणूक लढवायला हिंमत लागते. निलेश राणेंच्या या ट्वीटचा समाचार घेत आदित्य ठाकरेंसाठी अमेय घोले मैदानात उतरले.

आदित्य ठाकरेंच्या एंट्रीची चर्चा

राज्याचं आणि देशाचं राजकारण आपल्या रिमोट कंट्रोलवर चालवणाचा करिष्मा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवला. सत्तेत कोणतं पद न उपभोगता बाळासाहेबांनी बाहेरूनच सत्तेवर वचक ठेवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन मातोश्रीवरूनच सत्तेची सूत्र हलवली. मात्र या ठाकरे परिवारातील तिसरी पिढी आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार तसेच राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पदावर देखील विराजमान होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

सत्तेवर बाहेरून कंट्रोल ठेवण्यापेक्षा थेट संसदीय राजकारणात येण्याची ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीची महत्वाकांक्षा आहे. युवासेप्रमुख आदित्य ठाकरेंना संसदीय राजकारणात रस आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.

वरूण देसाई यांच्या या इस्टाग्राम पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. याआधीच आदित्य ठाकरेंनी पर्यावरण, शिक्षण, खेळ आणि सामाजिक उपक्रमांमधील आपली रूची वारंवार दाखवली आहे. अलीकडे संसद आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील आदित्य ठाकरेंनी पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. अगदी संसद आणि विधिमंडळाचं काम समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच युवासेनाप्रमुख म्हणून शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता पक्षात अगदी तरुण वयात त्यांना नेतेपदी बढतीही मिळाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ते एनडीएच्या बैठकांना देखील उपस्थित राहातात. पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, संकल्पना, दिशा ठरवताना आदित्य यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

आदित्य ठाकरेंचा करिअर ग्राफ

सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेताना राजकारणात प्रवेश

महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच विद्यार्थांच्या प्रश्नांवर राज्यपालांची भेट

महाविद्यालयीन काळात अनेक वेळा विद्यार्थांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व

2010 साली बाळासाहेबांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश

2010 साली स्थापन झालेल्या युवासेनेच्या अध्यक्षपदी वर्णी

2011 सिनेट निवडणुकीत युवा सेनेच्या पहिल्या प्रयत्नात घवघवीत यश

आदित्य यांच्या नेतृत्वाखाली 2018 च्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेला विक्रमी यश

2014 साली शिवसेनेचं मिशन 150 ठरवण्यात आदित्य ठाकरेंची महत्वाची भूमिका

2018 साली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नेतेपदी बढती

मुंबईत नाईट लाईफच्या परवानगीसाठी आदित्य ठाकरे आग्रही

मुंबईसह ठाणे, नाशिक, पुण्यात ओपन जिम संकल्पना राबवण्यात यशस्वी

2010 साली बाळासाहेबांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेंनी युवासेनेचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरेंसंदर्भात शिवसैनिकांना मोठ्या आशा आहेत. आदित्य यांनी केंद्रीय राजकारणात छाप पाडावी अशी भूमिका असलेला एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. मात्र या सर्व चर्चांना आदित्य ठाकेरेंनीच पूर्णविराम दिला होता. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील असे संकेत देखील त्याचवेळी दिले होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेच्या पदरात उपमुख्यमंत्रीपद पडण्याची शक्यता आहे. यासाठी विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाईंचं नाव पुढे येत असलं तरी शिवसेनेतून त्यांना विरोध होण्याची शक्यता नाकारती येत नाही. अशा वेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची शक्यता आहे. तसेच आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. असं झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे हे सर्वात तरूण उपमुख्यमंत्री बनतील. तसेच त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणूक देखील लढवावी लागेल. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित विधानसभा मतदार संघाची चाचपणी सुरु आहे.

आदित्य ठाकरेंसाठी मतदार संघाची चाचपणी

सुरक्षित मतदारसंघ : वरळी

सुरक्षित मतदारसंघ : शिवडी

सुरक्षित मतदारसंघ : माहीम

सुरक्षित मतदारसंघ : खेर वाडी (वांद्रे पूर्व)

सुरक्षित मतदारसंघ : जोगेश्वरी

आदित्य ठाकरेंसाठी मुंबईतील या पाच मतदार संघाचा प्रामुख्याने विचार केला जात असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहिम या दोन मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहिममध्ये सदा सरवणकर हे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी हे दोन्ही मतदारसंघ अधिक सुरक्षित मानले जातायत. त्यात शिवसैनिकांबरोबरच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनीही आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आतापर्यंत ठाकरे घराण्याने मातोश्रीवरून शिवसेना आणि राजकारणाची सूत्रे हाताळली आहेत. याआधी ठाकरे कुटुंबातील कोणत्याच सदस्याने याआधी प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा शिवसैनिकांनी अनेक वेळा व्यक्त केली आहे. तर ठाकरे कुटुंबातील आणखी एक वारसदार राज ठाकरे यांनी देखील निवडणूक लढवावी अशी आशा मनसैनिकांनी वर्तवली आहे. मात्र आता याच ठाकरे कुटुंबाचा नवा वारसदार आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतो का? तसेच निवडणुकीच्या रिंगणात उतरून नवा पायंडा पाडणार का हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.