नाणार प्रकल्पाला पाठिंबा भोवला, शिवसेना विभागप्रमुखाची पदावरुन उचलबांगडी

| Updated on: Feb 19, 2020 | 3:30 PM

शिवसेनेने नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची पदावरुन उचलबांगडी केली आहे.

नाणार प्रकल्पाला पाठिंबा भोवला, शिवसेना विभागप्रमुखाची पदावरुन उचलबांगडी
Follow us on

रत्नागिरी : सत्तास्थापनेनंतर शिवसेनेची नाणार प्रकल्पाबाबतची भूमिका बदलली का? असा प्रश्न विचारत विरोधकांकडून शिवसेनेवर सडकून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेतल्याने चर्चेला उधाण आले (Supporters of Nanar Project in Shivsena). अखेर शिवसेनेने नाणार प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या विभाग प्रमुखाची पदावरुन उचलबांगडी केली आहे. शिवसेनेने राजा काजवे यांना विभाग प्रमुखपदावरुन हटवत त्याजागी कमलाकर कदम यांची नियुक्ती केली आहे.

राजा काजवे हे सागवे जिल्हा परिषद गटाचे विभागप्रमुख होते. त्यांच्यावर कारवाईनंतर आता इतर समर्थकांवर काय कारवाई होणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंब्याची भूमिका घेणाऱ्या उर्वरित पदाधिकाऱ्यांबाबतचा अहवाल मागितला आहे. या अहवालानंतर इतर पदाधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सामना वृत्तपत्रातून नाणार रिफायनरी प्रकल्पाचे गुणगान गाणारी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नाणारचे समर्थन करण्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्यात राजापूरमधील शिवसैनिकांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दाखवण्यासाठी थेट सिंधुदुर्गात येवून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाणारला पाठिंबा देणाऱ्या शिवसैनिकांवर कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. या प्रकरणी आता रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी सावध भूमिका घेतली आहे.

नाणारच्या मुद्द्यावर भाजपचे नेते नारायण राणे यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले होते, “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कोकणाला काय मिळाले? हा सर्व दौरा हेलिकॉप्टरने करण्यात आला होता. रत्नगिरी नाणार संदर्भात यात एकही शब्द बोलले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन म्हणून किती निधी मिळाला? काही सांगितले नाही. देशातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गची ओळख आहे. कोणत्या योजनेला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिले नाहीत.”

Action against supporter of Nanar Project in Shivsena