सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त होण्याच्या मार्गावर

काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा आता भाजप आणि शिवसेनेने काबिज केलाय, तर राष्ट्रवादीचीही गळती (Congress and NCP Solapur) सुरुच आहे.

  • रोहित पाटील, टीव्ही 9 मराठी, सोलापूर
  • Published On - 16:54 PM, 31 Aug 2019
सोलापूर जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त होण्याच्या मार्गावर

सोलापूर : 2014 नंतर देशाच्या राजकारणात मोठी उलथापलथ सुरु झाली आणि 2019 मध्ये तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गळती (Congress and NCP Solapur) लागलीच आहे, पण राज्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात दोन्ही काँग्रेसचं अस्तित्व संपण्याची परिस्थिती (Congress and NCP Solapur) निर्माण झाली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांच्या काळात काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सोलापूर जिल्हा आता भाजप आणि शिवसेनेने काबिज केलाय, तर राष्ट्रवादीचीही गळती (Congress and NCP Solapur) सुरुच आहे.

मोदी पर्वाने राजकारण बदललं

सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यात साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याने एकाच वेळी राज्याला काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांच्या रूपाने मुख्यमंत्रीपद दिलं. याच सोलापुरातून काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या, तर माढ्यातून शरद पवार यांनी कृषीमंत्र्याच्या रूपाने देशाचं नेतृत्व केलं.

सोलापूर शहरात काँग्रेस आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मोठी भरभराट होती. त्यामुळे या दोन्ही पक्षांची अभेद्य असलेली भिंत ढासळण्याची कुणी कल्पनाही केली नसेल. मात्र 2014 नंतर मोदी पर्व सुरु झालं. 2014 ची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने सलग 15 वर्ष सत्तेत असणाऱ्या दोन्हीही काँग्रेसच्या शिलेदारांना सत्तेविनाची पाच वर्ष मोठ्या नेत्यावर झालेली कारवाईमुळे धाकधुकीची गेली.

विश्वासू शिलेदारांनीही साथ सोडली

यानंतर मोदी पर्व एवढ्यावरच थांबणारं नव्हतं. 2019 ला दुसऱ्यांदा मोदी लाटेचा करिष्मा आणि भाजपला मिळालेलं भरघोस यश पाहता या शिलेदारांची तर झोप उडाली आणि विधानसभेत आपला गड कायम राहिल की नाही या भीतीने भाजपा आणि शिवसेनेचं दार ठोठावलं जाऊ लागलंय. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकेक आमदार आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडताना दिसतोय.

जिल्ह्यातील काँग्रेसचे तीन विद्यमान आमदार, शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde), अक्कलकोटचे सिद्धराम म्हेत्रे (MLA Siddharam Mhetre), पंढरपूरचे भारत भालके (MLA Bharat Bhalke) या तिघांच्या उमेदवारीसाठी प्रदेश कमिटीकडे शिफारस करण्यात आली आहे. मात्र प्रणिती शिंदे यांचा अपवाद वगळता भारत भालके आणि सिद्धाराम म्हेत्रे यांची पक्ष बदलाची हालचाल सुरु आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांनी तर कार्यकर्ता मेळावा घेऊन आपण काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं जाहीर करत काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखतीला दांडी मारली. भरत भालके आणि म्हेत्रे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वप्रथम प्रशांत परिचारकांनी राष्ट्रवादीला धक्का देत भाजपच्या बळावर विधान परिषदेत आमदारकी मिळवली. त्या नंतर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील कुटुंबीयांनी मोठा धक्का दिला आणि माढा मतदारसंघातील पराभवाचा झटका बारामतीकरांना बसला. गळती एवढ्यावरच थांबलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय दिवंगत नेते माजी मंत्री दिगंबर बागल यांच्या कन्या रश्मी बागल (Rashmi Bagal in Shivsena) यांनी राष्ट्रवादीत न्याय दिला जात नसल्याचा आरोप करत थेट मातोश्री गाठलं, तर बार्शीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal in Shivsena) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवबंधनात अडकले. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे (MLA Baban Shinde) यांनीही राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला दांडी मारून पक्ष बदलाचे संकेत दिले आहेत. आमदार शिंदेंचे पुत्र रणजित शिंदे हे भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असून ते उमेदवारही असण्याची शक्यता आहे.

प्रणिती शिंदेंना पक्षातूनच आव्हान

राष्ट्रवादीचे नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे राष्ट्रवादीची शिवस्वराज यात्रा सुद्धा मोहोळ, पंढरपूर वगळता जिल्ह्यात फिरकली नाही. तर जिल्ह्यातील आता एकमेव काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या शहर मध्यमधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीला स्वकियांनीच आव्हान दिलंय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

“काँग्रेसमधून जाणाऱ्यांना रोखण्यासाठीही कुणी नाही”

दक्षिण सोलापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. याच मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदेनी राज्याचं नेतृत्व केलं. मात्र या मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी कब्जा केला. याच मतदारसंघातून माजी आमदार दिलीप मानेंना निवडणूक रिंगणात उतरवलं जाणार होतं. काँग्रेसची झालेली वाताहत आणि नेतृत्वाच्या अभावामुळे काँग्रेसला रामराम करत दिलीप मानेंनीही शिवधनुष्य हाती घेतलं. विशेष म्हणजे काँग्रेसला गळती लागलेली असताना रोखणारा एकही नेता काँग्रेसमध्ये नसल्याची खंत मानेंनी व्यक्त केली.

प्रत्येक नेता सत्ता पक्षात जाण्यासाठी सर्व काही करतोय, असं राजकीय विश्लेषक सांगतात. सोलापूर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहता दोन्ही काँग्रेसमध्ये निवडणुकीपूर्वी मोठी गळती लागली आहे आणि हीच गळती आगामी काळातल्या मोठ्या संकटाची नांदी आहे. शिवसेना आणि भाजपने मतदारसंघनिहाय विजयाची रणनिती केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत नेते थांबायला तयार नाहीत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व चित्र दिसणार हे नक्की झालंय.