काहींचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होतं, आता झालं गेलं विसरुन बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न : जयंत पाटील

| Updated on: May 01, 2020 | 2:54 PM

विधानपरिषद निवडणूक घोषणेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (Jayant Patil on Uddhav Thackeray MLC)

काहींचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होतं, आता झालं गेलं विसरुन बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न : जयंत पाटील
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Jayant Patil on Uddhav Thackeray MLC) कारण महाराष्ट्रात रखडलेली विधानपरिषद निवडणूक घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार येत्या 21 मे रोजी राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणूक घोषणेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. (Jayant Patil on Uddhav Thackeray MLC)

“देश कोरोनाविरोधात लढत असताना, काही लोकांचं लक्ष सरकार अस्थिर कसं होईल याकडेच होतं. त्यासाठी त्यांनी बराच वेळ घालवला, आता झालं गेलं विसरुन ही निवडणूक बिनविरोध कशी होईल हे पाहू”, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

“आम्ही नियुक्तीबाबत राज्यपालांना विनंती केली होती, लवकर निर्णय होणे अपेक्षित होतं, मात्र झाला नाही, त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी निवडणूक आयोगाला विनंती करुन 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची मागणी केली, ती मान्य झाली, आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शंभर टक्के निवडून येतील. अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते, हे सरकार अस्थिर होईल याचे प्रयत्न झाले, त्या सर्वांना यामुळे चपराक बसली आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.

“काही लोक राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरलं आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर सदस्य करा, नियुक्ती करा अशी विनंती केली होती, पण आता उद्धव ठाकरे यांची नियुक्तऐवजी निवडच होणार आहे”, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.

‘काहींचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होतं’

निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नोटिफिकेशनही निघालं आहे. आता आम्ही तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसून, सूसूत्रता ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका करु. किमान आता झालं गेलं विसरुन जाऊन, निवडणुका बिनविरोध कशा होतील, हे बघण्याचं प्रयत्न आम्ही करु, असं जयंत पाटील म्हणाले.

काही लोकांचं लक्ष उद्धव ठाकरेंच्या खुर्चीकडे होतं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. आम्ही त्याकडे काही लक्ष दिलं नाही, आम्ही मंत्रिमंडळाच्या रेग्युलर बैठकीत दोनवेळा ठराव करुन एकदा जाऊन राज्यपालांना भेटलो. त्यापलिकडे आम्ही या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं नाही. कारण आम्हाला राज्यातील कोरोनाची काळजी जास्त होती, त्याला प्राधान्य देऊन आम्ही काम करत होतो. त्यामुळे आमचा फारसा वेळ गेला नाही, पण काही लोकांनी या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी बराच काळ घालवला. राज्याच्या बरोबर राहण्याऐवजी ते भरकटत गेले आणि महाराष्ट्र अस्थिर कसा करायचा याचे प्रयत्न काही लोकांनी केले, हे मात्र नक्की, असं जयंत पाटील म्हणाले. (Jayant Patil on Uddhav Thackeray MLC)