बिहार निवडणुकांनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चिन्हं, ‘या’ मंत्र्याची वर्णी निश्चित?

सुनील केदार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचे निश्चित मानले जाते

बिहार निवडणुकांनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चिन्हं, या मंत्र्याची वर्णी निश्चित?
Balasaheb Thorat
| Updated on: Nov 01, 2020 | 10:52 AM

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी महाविकास आघाडी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याची वर्णी निश्चित मानली जाते. काँग्रेसचे दिग्गज नेते आणि पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. (Sunil Kedar may elected as Maharashtra Congress State President)

राहुल गांधी यांच्या खांद्यावर जानेवारी महिन्यात काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाण्याचे संकेत आहेत. त्याआधीच सुनील केदार यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. राहुल गांधी यांच्या नवीन टीममध्ये युवकांना प्राध्यान्य देण्यात येणार आहे. सुनील केदार यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांची नावंही शर्यतीत असल्याचे बोलले जाते.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ऑगस्ट महिन्यात 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र पाठवले होते. त्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र होते. “काँग्रेस नेते मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा यांनी गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद आहे” अशी टीका सुनील केदार यांनी केली होती.

मध्य प्रदेशची जबाबदारी

मध्य प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकीत समन्वयाची जबाबदारी काही दिवसांपूर्वीच सुनील केदार यांच्याकडे सोपवण्यात आली होती.  मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी सुनील केदार यांची नियुक्ती केली होती. मुरैना आणि ग्वाल्हेर या दोन्ही जिल्ह्यांचे निवडणूक समन्वयक म्हणून सुनील केदार काम पाहत होते. म्हणजेच नुकतेच भाजपवासी झालेले राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांना सुनील केदार यांचे थेट आव्हान होते.

मुरैना जिल्ह्यातील जौरा, सुमावली, मुरैना, दिमनी आणि अंबाह, तर ग्वाल्हेर जिल्ह्यातील ग्वाल्हेर, ग्वाल्हेर पूर्व आणि डबरा या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. यापूर्वीही सुनील केदार यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचे समन्वयक म्हणून काम केले आहे. (Sunil Kedar may elected as Maharashtra Congress State President)

सुनील केदार यांचा परिचय

सुनील केदार हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे ते सुपुत्र. सुनील केदार नागपुरातील सावनेर मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांच्याकडे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडाआणि युवक कल्याण मंत्रालयाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची धुरा आहे. सुनील केदार यांच्याकडे वर्ध्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे.

संबंधित बातम्या :

सुनील केदार ग्वाल्हेरचा गड लढवणार, ज्योतिरादित्य शिंदेंना थेट आव्हान

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल

(Sunil Kedar may elected as Maharashtra Congress State President)