अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे

| Updated on: Feb 28, 2020 | 11:57 AM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे (Supriya Sule demands Amit Shah resignation) ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा : सुप्रिया सुळे
Follow us on

जळगाव : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर असताना राजधानी दिल्लीत हिंसाचार उसळणे (Supriya Sule demands Amit Shah resignation) ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. दिल्लीत घडलेला हिंसाचार हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Supriya Sule demands Amit Shah resignation)

खासदार सुप्रिया सुळे शुक्रवारी जळगावच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशात आलेले असताना दिल्लीत अशा पद्धतीने दंगल होणे, हे खरं तर गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे.

दंगलीच्या काळात गृहमंत्रालय नेमकं काय करत होते? याची चौकशी पंतप्रधान कार्यालयातून झालीच पाहिजे. परंतु त्या आधी ‘इंटेलिजन्स फेल्युअर’ची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली. अमित शाहांच्या जागी मी असते तर निश्चितच आत्मचिंतन केले असते, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, मागील 5 वर्षे ज्यांनी पारदर्शक काम केल्याचा दावा केला आहे, अशा फडणवीस सरकारने त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर द्यायला हवं. त्यासाठी जाहीर माहिती दिली पाहिजे.

महिला सुरक्षेसाठी कायदे करणार

राज्यात सत्तारूढ झालेले महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. इतर बाबतीतही सरकार चांगले काम करत आहे. महिला सुरक्षेसाठी अजून चांगले आणि कठोर कायदे सरकार करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.