आलं तर आलं तुफान… राजकीय भूकंपात सुप्रिया सुळे यांची ‘ती’ पोस्ट तुफ्फान व्हायरल

अजित पवार यांनी बंड केल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. दोन्ही गटाने आता एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. माझीच बाजू खरी असल्याचं सांगण्याचा प्रयत्नही सुरू केला आहे.

आलं तर आलं तुफान... राजकीय भूकंपात सुप्रिया सुळे यांची ती पोस्ट तुफ्फान व्हायरल
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 08, 2023 | 8:44 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनीच पक्षात बंड केल्याने ही फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासोबत तब्बल 40हून अधिक आमदार पक्ष सोडून गेले आहेत. या बंडखोरांनी भाजपसोबत हातमिळवणीही केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप झाला आहे. पक्षातील बंडाच्या या वादळाला रोखण्यासाठी स्वत: शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कुणाला साथ द्यावी आणि कुणाला नाही असा प्रश्न या कार्यकर्त्यांपुढे पडला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या एका विधानाचा आधार घेतला आहे. यशवंतराव चव्हाण यांनी 7 मे 1984 रोजी अहमदनगरमध्ये हे विधान केलं होतं. त्याचाच सुप्रिया सुळे यांनी आधार घेतला आहे.

चव्हाण काय म्हणाले?

आलं तर आलं तुफान- तुफालाना घाबरून काय करायचं? तुफानाला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. तुफानापासून पळून जाणाऱ्या माणसाच्या हातून काही घडत नाही. तुफानाला तोंड देण्याची जी शक्ती आणि इच्छा आहे, त्यातनं तो काहीतरी करू शकतो आणि घडवू शकतो, अशी माझी धारणा आहे, असं यशवंतराव चव्हाण म्हणाले होते. तेच विधान सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. त्यांचं हे ट्विट तुफान व्हायरल झालं आहे.

 

कुणाला टोला, कुणाला धीर?

दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या या सुप्रसिद्ध विधानाचा आधार घेऊन सुप्रिया सुळे यांनी काहींना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. तर काहींना सल्ला, धीर दिला आहे. जे लोक तपास यंत्रणांच्या कारवाईला घाबरून पक्षातून पळून गेले त्यांना सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे. तर पक्ष फुटला असला तरी आपल्यात उमेद आहे. नव्याने पक्ष उभा करू, असा कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्नही सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमधून केल्याचं सांगण्यात येत आहे.