संजय राऊतांचा इशारा खरा ठरणार; फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार?

| Updated on: Mar 25, 2021 | 1:21 PM

उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. | Phone tapping case Thackeray govt

संजय राऊतांचा इशारा खरा ठरणार; फोन टॅपिंग प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा गृह मंत्रालय आणि पोलीस मुख्यालयाला आदेश
Follow us on

मुंबई: राज्यातील काही मंत्र्यांचे फोन टॅप करुन मिळालेल्या माहितीच्याआधारे भाजपने ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Govt) आरोपांची राळ उडवून दिली आहे. भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सुरुवातीला बचावात्मक पवित्रा घेणारे महाविकासआघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते आता डॅमेज कंट्रोलसाठी पुढे सरसावले आहेत. फोन टॅपिंग प्रकरणाच्या सूत्रधार असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर कारवाई करण्याची तयारी ठाकरे सरकारने सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Thackeray govt preparing for battle in phone tapping case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना फोन टॅपिंग प्रकरणाचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण विरोधकांवरच बुमरँग होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

रश्मी शुक्ला या राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त असताना, कोणतेही कायदेशीर अधिकार नसताना त्यांनी राज्यातील काही महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींचे, सनदी अधिकाऱ्यांचे; तसेच काही पत्रकारांचेही फोन टॅप केले होते काय, याचा माग आता सरकारकडून काढला जाणार आहे. हे संपूर्ण प्रकरण घडले तेव्हा सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा अहवाल महाविकासआघाडीसाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे.

संजय राऊतांनी दिला होता इशारा

केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहे. मात्र, हे प्रकरण त्यांच्यावर बुमरँग होईल, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.

भाजपच्या काळातील पोलीस बदल्यांचा रेकॉर्ड तपासणार?

फडणवीस सरकारने 2014 ते 2019 या कालावधीत राजकीय शिफारशीमुळे झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालय आणि पोलीस मुख्यालयाला दिल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेत फडणवीस सरकारच्या काळात बदल्यांचा तपशील आणि शिफारस पत्रे देण्याचे आदेश दिले. याबाबतची माहिती सार्वजनिक करण्यात येणार आहेत. यांपैकी काही पत्रे मंत्रालयात, तर काही पत्रे पोलिस महासंचालकांच्या कार्यालयात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीताराम कुंटे पत्रकारपरिषद घेण्याची शक्यता

राज्याचे मुख्य सचिन सीताराम कुंटे यांच्या परवानगीविना राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ठाकरे सरकारकमधील मंत्र्यांचे फोन टॅपिंग केले. सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत असताना अतिरिक्त पोलीस संचालक रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगची परवानगी दिली असल्याचे रश्मी शुक्ला यांनी म्हटले होते. परंतु सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या परवानगीविना २ महिन्यांपूर्वी फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. त्यामुळे या फोन टॅपिंग प्रकरणात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भूमिका संशयास्पद झाली आहे. या प्रकरणावर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अद्याप मौन धारण केले आहे.

मुख्य सचिव सीताराम कुंटे आज पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याची शक्यता आहे. फोन टॅपिंग करण्यात आले त्यावेळी सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी कार्यरत होते. तेव्हा रश्मी शुक्ला या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी कार्यरत होत्या. रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती.

‘ आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढायला पाहिजे’

बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन टॅपिंगच्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला. आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो. अशाप्रकारे फोन टॅप होत राहिले तर अधिकाऱ्यांवर विश्वास तरी कसा ठेवायचा, असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढायला हवेत. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सांगितले.

संबंधित बातम्या:

Thackery Govt meeting: ‘ आपण अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, पण आता लढायला पाहिजे’

अनिल देशमुखांचं ट्विट, म्हणतात, ‘दूध का दूध, पानी का पानी करावे!’

(Thackeray govt preparing for battle in phone tapping case)