मोठी बातमी : राज्यपालांची भेट मागितली, उद्या मंत्रिमंडळ विस्तार, कोण होणार नवे मंत्री?

मुख्यमंत्री दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. सोमवारी दुपारी राजभवनात अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

मोठी बातमी : राज्यपालांची भेट मागितली, उद्या मंत्रिमंडळ विस्तार, कोण होणार नवे मंत्री?
PM NARENDRA MODI AND AMIT SHAH
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Dec 24, 2023 | 10:34 PM

भोपाळ | 24 डिसेंबर 2023 : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका भाजपने लढविल्या. कॉंग्रेसला पराभूत करून चौहान यांनी भाजपचा झेनाद फडकवला. पण, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवराजसिंग चौहान यांचे नाव बाजूला करून मोहन यादव यांना मुख्यमंत्री केले. भाजपच्या या निर्णयाचे राज्यात मोठे पडसाद उमटले होते. त्यामुळे मोहन यादव सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. मात्र, यावर आता पडदा पडला आहे. मोहन यादव मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार आहे.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्याकडे वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री यादव हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. सोमवारी दुपारी राजभवनात अनेक आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री यादव सोमवारी सकाळी राज्यपालांना भेटून शपथ घेणार्‍यांची यादी सोपवतील.

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात काय ठरलं?

मुख्यमंत्री यादव हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी अनेक केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. वरिष्ठ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री यादव यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली. मुख्यमंत्री यादव यांनी भाजप हायकमांडशी विस्तृत चर्चा करून मंत्र्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले असे बोलले जात आहे.

मंत्र्यांची नावे ठरली

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतर मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांचा समावेश करायचा हे ठरले आहे. मोहन मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जातीय आणि प्रादेशिक समीकरणे सोडवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत 18 ते 20 मंत्री केले जाऊ शकतात. हायकमांडकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रदेश पातळीवर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू झाली आहे.

शिवराज सिंह चौहान काय म्हणाले?

माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आता विकसित भारत करू या, लवकरच मंत्रिमंडळ स्थापन होईल अशी प्रतिक्रिया दिली.