विषयच संपला! शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा बॅकफूटवर, बच्चू कडू यांनाही दिला ‘हा’ सल्ला

| Updated on: Oct 31, 2022 | 11:07 AM

आमदार रवी राणा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तीन ते चार तास चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली.

विषयच संपला! शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा बॅकफूटवर, बच्चू कडू यांनाही दिला हा सल्ला
विषयच संपला! शिंदे-फडणवीस यांच्या भेटीनंतर रवी राणा बॅकफूटवर, बच्चू कडू यांनाही दिला 'हा' सल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मी माझे शब्द मागे घेतो. माझ्यामुळे गुवाहाटीला गेलेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आता विषय संपला आहे. या वादावर पडदा पडला आहे, असं सांगत भाजप समर्थक आमदार रवी राणा ((ravi rana)) यांनी बच्चू कडू यांच्या वादावर पूर्णविराम पडल्याचं जाहीर केलं आहे. तसेच मी जसे शब्द मागे घेतले, त्याच पद्धतीने बच्चू कडूही ( (bacchu kadu)) आपले शब्द मागे घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यासोबत 20 मिनिटे चर्चा केल्यानंतर रवी राणा मीडियाशी संवाद साधत होते.

आमदार रवी राणा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी तीन ते चार तास चर्चा केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी 20 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना त्यांनी बच्चू कडू यांच्याबरोबरचा वाद संपला असून आम्ही एकत्रित काम करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या आठ दहा दिवसांपासून वाद सुरू होता. शाब्दिक चकमकी होत होत्या. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांनी आम्हाला बोलावलं. सीएम बंगल्यावर साडेतीन तास चर्चा झाली. मतभेद होते. काही वाक्य न पटणारी होती. त्यावरही चर्चा झाली. भाषेवरही चर्चा झाली. आम्ही दोघे अमरावतीचे आमदार. दोघेही सरकारसोबत आहोत, असं रवी राणा म्हणाले.

मतभेद झाल्यावर काही शब्द गेले असतील. गुवाहाटीबाबत आमचे काही शब्द गेले. अपक्ष आमदार, शिवसेनेचे आमदार हे माझे सहकारी आहेत. काही वाक्य निघाले असतील तर मी परत घेत आहे. बच्चू कडू यांच्या तोंडूनही अपशब्द निघाले आहेत. मी खिसे कापून किराणा वाटतो, असं ते म्हणाले होते. त्यांचं हे वाक्यही न पटणारं. त्यांची भाषा खालच्या स्तरावरची होती. त्यांनीही आपले शब्द मागे घ्यावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

आम्ही सरकारचे घटक आहोत. पूर्ण ताकदीने सरकार सोबत आहोत. महाराष्ट्राचा विकास व्हावा ही आमची इच्छा आहे. उद्धव ठाकरे अडीच वर्षात प्रश्न सोडवू शकले नाहीत. पण तीन महिन्यात या सरकारने कामे मार्गी लावण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आमच्या वादापेक्षा सरकार सुरळीत चालणं महत्त्वाचं आहे. माझ्या शब्दांनी कुणाचं मन दुखावलं असेल, आमदारामंध्ये गैरसमज झाले असतील तर शब्द मागे घेत आहे. बच्चू कडूयांनीही शब्द मागे घ्यावे. दिलगिरी व्यक्त करतो, असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

या वादावर पडदा पडला आहे. कधीही बोलताना कोणती चूक झाली तर मोठं मन करून शब्द मागे घेतले पाहिजे, या विचाराने पुढे आलो आहे. काही घडल्यावर दोन पाऊल मागे घेऊन पुढे जावं लागतं. त्यामुळे मी दोन पाऊल मागे घेत आहे. फडणवीस हे माझे नेते आहेत. त्यांचा आदेश माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यामुळे मी शब्द मागे घेत आहे. वाद विवाद नको. त्यामुळे शब्द मागे घेतो. मी शब्द मागे घेतले. दिलगीरी व्यक्त केली. त्यापेक्षा वेगळं काही नाही. हा वाद संपला आहे, असंही ते म्हणाले.