Shivsena Entry : कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

| Updated on: May 06, 2022 | 7:27 PM

कल्याण-डोंबिवली आणि दिवा परिसरातील भाजप आणि मनसेच्या पदाधिकऱ्यांनी आपले पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची या भागातील ताकद वाढली आहे. त्यामुळे याचा फायदा आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला नक्की होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.

Shivsena Entry : कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेच्या दोन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मनसेच्या कल्याण डोंबिवलीमधील दोन माजी नगरसेवकांना शिवसेने (Shivsena)त प्रवेश देऊन शिवसेनेने मनसे (MNS)ला जोरदार धक्का दिला आहे. मनसेचे माजी नगरसेवक पूजा पाटील आणि प्रकाश माने यांचा शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पूजा पाटील आणि प्रकाश माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत मनसेचे कल्याण तालुका प्रमुख गजानन पाटील, सुभाष पाटील, भास्कर गांगुर्डे, प्रवीण परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी देखील हातात भगवा झेंडा आणि मनगटावर शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सगळ्यांना शुभेच्छा देत भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे हेदेखील उपस्थित होते. (Two former MNS corporators join Shiv Sena in Kalyan-Dombivali Municipal Corporation)

विकासकामांना मिळलेली ही पावती : एकनाथ शिंदे

मंत्री शिंदे यांनी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करताना ‘शिवसेनेच्या वतीने कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना मिळलेली ही पावती असल्याचे सांगितले. कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून शहरात सुरू असलेली विकासकामे पाहता अशी विकासकामे आपल्या विभागात देखील व्हावी, या इच्छेने अनेक जण शिवसेनेशी जोडले जात असल्याचे सांगितले. हे सर्वजण स्वतःहून आम्हाला पक्षात घ्या असे सांगून आले असल्याने त्यासाठी मुद्दाम प्रयत्न करून कुणाला पक्षात आणलेले नाही’ असेही यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले.

येणाऱ्या काळात ही संख्या अधिक वाढेल : श्रीकांत शिंदे

कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना ‘कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या अनेक विकासकामे सुरू असून या विकासाचा भाग होण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. याच भावनेतून आपल्या विभागाचा देखील अशाच पद्धतीने सुनियोजितपणे विकास व्हावा, या दृष्टिकोनातून आज या दोन्ही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. यापूर्वी देखील राजेश कदम, सागर जेधे, अर्जुन पाटील हे मनसेमधून भाजपमध्ये आले आहेत. तर भाजपमधून महेश पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल झाले होते. येणाऱ्या काळात ही संख्या अधिक वाढत जाईल’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

कल्याण-डोंबिवली आणि दिवा परिसरातील भाजप आणि मनसेच्या पदाधिकऱ्यांनी आपले पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेनेची या भागातील ताकद वाढली आहे. त्यामुळे याचा फायदा आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला नक्की होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. (Two former MNS corporators join Shiv Sena in Kalyan-Dombivali Municipal Corporation)