Uddhav Thackeray | बंडखोरांची जाहिरात सामना वृत्तपत्राने नाकारली, खासदार राहुल शेवाळेंची माहिती

| Updated on: Jul 27, 2022 | 11:15 AM

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर भरपूर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती फुलांनी साकारली आहे.

Uddhav Thackeray | बंडखोरांची जाहिरात सामना वृत्तपत्राने नाकारली, खासदार राहुल शेवाळेंची माहिती
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त आज सर्वच राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे. शिवसेनेचे आमदार-खासदारदेखील दरवर्षी विविध वृत्तपत्रांतून उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतात. सामाना वृत्तपत्रातही या शुभेच्छांच्या जाहिराती प्रकाशित होत असतात. शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडलेल्या आमदार आणि खासदारांनी या वर्षीदेखील अशी जाहिरात देण्यासाठी सामना वृत्तपत्राच्या कार्यालयाशी संपर्क साधला होता. मात्र तेथील कर्मचाऱ्यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार अथवा खासदार तसेच शिवसैनिकाला जाहिरात प्रकाशित करता येणार नाही, असे सांगितले. वरिष्ठ नेत्यांकडून तशा सूचना असल्याचंही सांगण्यात आलं. शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मला ज्या प्रमाणे सांगण्यात आले, तसाच नकार इतर खासदारांनाही देण्यात आला. उद्धव ठाकरेंबद्दल आजही आम्हाला आदर आहे. आम्ही त्यांना येथूनच शुभेच्छा देतो, असंही खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

कारणही सांगितलं नाही…

आज 27 जुलै रोजी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही ‘सामना’ मध्ये जाहिरातीसाठी संपर्क साधला असतो कर्मचाऱ्यांनी स्वीकारल्या नाहीत. यामागे काय कारण आहे, हे विचारलं असता तेदेखील सांगितलं नसल्याचं सांगण्यात आलं, अशी माहिती खासदार राहुल शेवाळेंनी दिली.

एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्चा दिल्या. ट्विटरवर त्यांनी म्हटले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

वाढदिवसानिमित्त विशेष मुलाखत

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामना या मुखपत्रातून उद्धव ठाकरे यांची दीर्घ मुलाखत प्रकाशित करण्यात आली आहे. या मुलाखतीचा व्हिडिओदेखील जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंबंधीचा टीझर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात होता. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात ही मुलाखत देण्यात आली. याद्वारे उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिवसैनिकांवर जोरदार हल्ला चढवला. मी रुग्णालयात बेशुद्ध अशताना या लोकांनी सरकार पाडल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मातोश्रीवर सजावटीत धनुष्यबाण

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर भरपूर रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती फुलांनी साकारली आहे. याच धनुष्यबाणावरून सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात वाद आहे. मात्र आज मातोश्रीबाहेर पक्षाचं हेच चिन्ह अगदी ठळकपणे सजवण्यात आलं आहे.