Uddhav Thackeray : मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा

| Updated on: Aug 08, 2022 | 8:46 PM

आता बातमी आलीय की उद्या विस्तार होणार. पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार? असा खोचक सवाल ठाकरेंनी केलाय. ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर आज शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

Uddhav Thackeray : मंत्रिमंडळ विस्तारानंतर काय दिवे लावणार?, आता मैदानात उतरलोय, उद्धव ठाकरेंचा इशारा
उद्धव ठाकरे
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर उद्या (मंगळवार, 9 ऑगस्ट) मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होत आहे. भाजप आणि शिंदे गटाचे प्रत्येकी 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना फोन गेले असून, त्यांना तातडीने मुंबईत दाखल होण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहेत. अशावेळी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर खोचक टीका केलीय. दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत पण पाळणा काही हलत नाही. आता बातमी आलीय की उद्या विस्तार होणार. पण विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार? असा खोचक सवाल ठाकरेंनी केलाय. ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर आज शिवसेना (Shivsena) पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, दोन जण दिल्लीला चकरा मारत आहेत पण पाळणा काही हालत नाही. आज बातमी आली की उद्या विस्तार होणार, विस्तार झाल्यावर काय दिवे लावणार? त्यांचं त्यांना लखलाभ असो. आता मी मैदानात उतरलो आहे, पळणार नाही. निष्ठा आणि पैसा अशी ही लढाई आहे, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय.

‘यांना नंतर लक्षात येईलं कसं वापरुन फेकून दिलं जातं’

मागील अनेक दिवसांपासून तुम्ही सगळे जोडले जात आहात. महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दारांना गाडते. भगव्याच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्या गद्दारांचं नामोनिशाण शिल्लक राहीलं नाही. भगवा मात्र तसाच फडकत आहे. गद्दाराच्या मतदारसंघात कमळ फुलवण्याची भाषा केली जाते. यांना नंतर लक्षात येईलं कसं वापरुन फेकून दिलं जातं. महाराष्ट्राच्या अस्मितेवर कुणी वार करणार असेल तर त्याचा नायनाट करणं आपलं कर्तव्य आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर, तसंच भाजपवरही जोरदार टीका केली.

उद्या मंत्रिमंडळ विस्तार

मंगळवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येकी 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या आमदारांना पक्षश्रेष्ठींकडून सकाळीपासून फोन गेले आहेत आणि त्यांना तातडीने मुंबईत पोहोचण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.