पोलिसांचा सौम्य लाठीमार… ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड, धक्कादायक प्रकाराने अंबरनाथमध्ये खळबळ
अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. सकाळी 200 हून अधिक बोगस मतदार पकडल्यानंतर, EVM मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस ओळखपत्रे आढळली. विविध मतदान केंद्रांवर गैरव्यवहार आणि भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमधील वादामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

राज्यातील 23 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान सुरू आहे. अंबरनाथ नगरपरिषदेसाठीही मतदान सुरू आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी गडबड गोंधळ झालेला पाहायला मिळत आहे. सकाळीच 208 हून बोगस मतदार पकडल्याची घटना घडली. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केलेली असतानाच ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्याकडेच बोगस आयकार्ड असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर काही ठिकाणी मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला आहे.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी, प्रभाग क्रमांक 29 मध्ये हा गोंधळ पाहायला मिळाला आहे. ईव्हीएम मशीन आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस आयकार्ड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्यांना सर्वच उमेदवारांनी आक्षेप घेतल्याने मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ झाला. या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याने दुसरं मशीन मागवण्यात आलं होतं. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. जे कर्मचारी मशीन घेऊन आले त्यांच्या आयकार्डवर फोटो आणि नाव तसंच सही, शिक्का देखील नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्याची चांगलीच बोबडी वळली होती.
पोलिसांचा लाठीमार
अंबरनाथ 15 नंबर वॉर्डमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. वातावरण चांगलंच तापल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. परिसरात तणावपूर्ण वातावरण पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.
लग्नाच्या नावाखाली बोगस मतदारांचं वऱ्हाड
दरम्यान, बोगस मतदार प्रकरणी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मतदारांचे ओळखपत्र आणि यादी पोलिसांनी तपासून संबंधित शिवसेना पदाधिकारी आणि संबंधित लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रदीप पाटील यांनी केली आहे.
लग्न कार्य नसताना दीडशे महिला त्या ठिकाणी पहिल्यांदा आल्या. काही महिला पळून गेल्या. हा आमचा आरोप नाही, आमचा दावा आहे. बोगस मतदान करण्यासाठी या महिलांना आणण्यात आलं होतं. पोलिसांनी त्यांचे आयडी चेक करावे. चौकशी करावी. नवरदेव आणि नवरीनेही ओळखपत्र आणलं नाही. पोलिसांनी या लोकांचे ओळखपत्र मागवावे. मतदान यादी तपासावी सगळं काही समोर येईल, असं पाटील म्हणाले.
ज्यांच्या लग्न सभागृहात हे प्रकरण झालं, तो हॉल ज्यांचा आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. शिवसेनेने बोगस मतदार आणून नावाला कलंक लावून घेतला आहे. शिवसेनेचे नेते चांगले. मात्र त्यांनी चार पक्ष फिरणाऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे. आम्ही कुठली मारहाण केली नाही. पोलीस आल्यावरच आम्ही घटनास्थळी आलो. आमच्यावर काहीही टीका करा. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या बोगस मतदारांचे आयडी चेक करा आणि त्यांची कसून चौकशी करा. सर्व सत्य बाहेर येईल, असंही ते म्हणाले.
