Uddhav Thackeray : ‘शिवसेना ताब्यात घेणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळवणार’, राजन साळवींना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना इशारा

उद्धव ठाकरे या आमदारांना पत्र पाठवून त्यांचे धन्यवाद देत आहेत. आमदार राजन साळवी यांनाही उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यात शिवसेना ताब्यात घेणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळवणार, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

Uddhav Thackeray : शिवसेना ताब्यात घेणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळवणार, राजन साळवींना लिहिलेल्या पत्रात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना इशारा
राजन साळवी, उद्धव ठाकरे (फाईल फोटो)
Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 2:48 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुकारलेल्या बंडामुळे शिवसेना दुभंगली आहे. बहुमत गमावल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण 40 आमदार गेले तर 10 समर्थक आमदारांनीही एकनाथ शिंदे गटात सहभागी होणं पसंत केलं. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 15 आमदार शिल्लक आहेत. उद्धव ठाकरे या आमदारांना पत्र पाठवून त्यांचे धन्यवाद देत आहेत. आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनाही उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. त्यात शिवसेना ताब्यात घेणाऱ्यांचे मनसुबे धुळीस मिळवणार, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिलाय.

उद्धव ठाकरेंचं राजन साळवींना पत्र

सध्याच्या विपरित घडामोडींच्या काळात तुम्ही शिवसेनेची असलेली आपली निष्ठा अभेद्य ठेवली. याबद्दल सर्वप्रथम शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून मी व्यक्तिशः व शिवसेना पक्षाच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. विशेषतः 4 जुलै रोजी फुटीर शिंदे गटाच्या सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावाला अनेक आमिषे व दबाव तंत्राचा वापर झाला असतानाही शिवसेना पक्षाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुम्ही ठाम विरोध केला. घटनेच्या दहाव्या परिशिष्टाच्या परिच्छेद 2 (1) (बी) खाली अपात्र होण्याची भीती दाखविली जात असताना शिवसेना पक्षाचे निर्देश झुगारुन देण्याचे फुटीरांचे डावपेच आपण जुमानले नाही याचा मला व तमाम शिवसैनिकांना सार्थ अभिमान वाटतो.

शिवसेनेच्या ध्येय धोरणांवरील अढळ श्रद्धेपायी तुम्ही एकनाथ शिंदेच्या फाटाफुटीच्या डावपेचांना पुरुन उरलात व त्यांनी बनविलेल्या बेकायदेशीर सरकारला भीक घातली नाही किंवा अपात्र होण्याची भीती बाळगली नाही.

एकनाथ शिंदे व त्यांच्या पाठिराख्यांचे शिवसेना बळकविण्याचे मनसुबे तुमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठबळावर मी धुळीस मिळविणारच हे अभिवचन आज आपल्याला देत आहे. शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली ही बलाढ्य शिवसेना आपण सर्वजण मिळून पुढील काळात अधिक उंचीवर नेऊ असा विश्वास व्यक्त करुया.