राष्ट्रपतींनाच नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचं आमंत्रण नाही तिथे इतरांचे काय?; देवेंद्र फडणवीस यांना दैनिक ‘सामना’तून टोला

| Updated on: May 26, 2023 | 10:21 AM

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.

राष्ट्रपतींनाच नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचं आमंत्रण नाही तिथे इतरांचे काय?; देवेंद्र फडणवीस यांना दैनिक सामनातून टोला
new parliament building
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन होणार आहे. नव्या संसद भवनाचं उद्धाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होत नसल्याने या उद्गाटनाच्या कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. ठाकरे गटानेही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना बोलवतोच कोण? असा सवाल करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाला डिवचले आहे. तर, राष्ट्रपतींनाच नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचं आमंत्रण नाही, तिथे इतरांचे काय? असा सवाल करत दैनिक ‘सामना’तून देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

आजच्या दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर देशातील 20 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाच्या इमारतीचं उद्घाटन करणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. नवे संसद भवन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे होते. ते परंपरेला धरून झाले असते. पण हे संसद भवन मी बांधले आहे. ही माझी इस्टेट आहे. इमारतीच्या कोनशीलेवर फक्त माझेच नाव राहील. मी आणि फक्त मीच, असे मोदींचे धोरण आहे, अशी खरपूस टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

विरोधकच देशभक्त

सध्याचे विरोधक हे राज्यकर्त्यांपेक्षा अधिक देशभक्त आहे. केवळ राष्ट्रपतींच्या हस्ते नव्या संसद भवनाचं उद्घाटन व्हावं एवढीच विरोधकांची अपेक्षा आहे. कारण राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आहेत. त्यांचा सन्मान राखला पाहिजे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या उद्घाटनाचे निमंत्रण राष्ट्रपतींना दिलेले नाही, असा दावा अग्रलेखातून करण्यात आला आहे.

आडवाणींना आमंत्रण आहे काय?

संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील भाजप भजनी मंडळातील टाळकुट्यांना कंठ फुटला आहे. संसद भवनाच्या उद्घाटनावर शिवसेनेने बहिष्कार टाकला आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांना बोलावतोच कोण? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांचीही टाळकुटी संस्कृती आहे. ज्या लालकृष्ण आडवाणींमुळे भाजपला अच्छे दिन पाहायला मिळाले त्यांना तरी नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे काय? की त्यांना गेटवरच आडवले जाणार आहे? असा सवाल करण्यात आला आहे.

मिंधे-फडणवीस यांना तेच आवडते

संसद भवनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षाचे नाव असते तर लोकशाहीची शोभा वाढली असती. पण आमच्या खासगी पंगतीत कोणी यायचे नाही. आला तर अपमान करू, असा संदेशच सरकारने दिला आहे. त्यामुळे जिथे राष्ट्रपतींनाच निमंत्रण नाही तिथे इतरांचे काय घेऊन बसलात? मिंधे-फडणवीस यांना अशा पंगतीत बसायला आवडेत. त्यामुळे त्यांनी जायला हरकत नाही. फक्त आडवाणी यांना एखादा कोपरा आहे का ते पाहा; असा चिमटाही काढण्यात आला आहे.