पाऊसही म्हणतोय ‘मी पुन्हा येईन’, उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या

उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केलं.

पाऊसही म्हणतोय मी पुन्हा येईन, उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या
| Updated on: Nov 04, 2019 | 7:42 AM

औरंगाबाद : ‘मी पुन्हा येईन’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेवरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत टोला लगावला. पाऊस जाताना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणतोय, त्यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray taunts Devendra Fadanvis) म्हणाले.

विधानसभा निवडणुकांआधी देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणत आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यानंतर अनेक प्रचारसभांमध्येही त्यांनी या घोषणेचा आधार घेत पुन्हा सत्तारुढ होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. फडणवीसांची घोषणा सर्वत्र चर्चेचा विषय असतानाच उद्धव ठाकरेंनीही त्यावरुन कानपिचक्या लगावल्या.

उद्धव ठाकरेंनी अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांना संबोधित केलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झाल्याचं ते म्हणाले. पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. पाऊस जाताना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ म्हणतोय. यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. अशा परिस्थितीत आपण सत्तास्थापनेचा विचार करणार असू तर आपण निर्घृण आहोत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्तासंघर्षावर थेट बोलणं टाळलं (Uddhav Thackeray taunts Devendra Fadanvis).

सरकार आल्यास सातबारा कोरा, शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून उद्धव ठाकरेंचा शब्द

मला शेतीतलं फारसं कळत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली 10 हजार कोटी रुपयांची मदत अतिशय अपुरी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

औरंगाबादेतील शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून उद्धव ठाकरे यांनी दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करीन, हे माझं वचन आहे, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते.

मी नेता म्हणून नाही, तर कुटुंब म्हणून आलो आहे. कारण भलेभले नेते मोठं झाल्यावर विसरुन जातात. पण मी तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.