5 जुलैला याच! उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना नवं आवाहन, थेट मनसेचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत मनसेचे नाव घेत नवे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाची सध्य्या सगळीकडे चर्चा होत आहे.

5 जुलैला याच! उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना नवं आवाहन, थेट मनसेचा उल्लेख करत नेमकं काय म्हणाले?
raj thackeray and uddhav thackeray
| Updated on: Jun 29, 2025 | 8:37 PM

Uddhav Thackeray And Raj Thackeray : राज्यभरातून विरोध झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी भाषेविषयीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. त्रिभाषा सूत्रानुसार इयत्ता पाहिलीपासून हिंदी भाषा शिकवली जाणार होती. पण सरकारच्या या धोरणाला विरोधकांनी मोठा विरोध केला होता. काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही, अशी भूमिका ठाकरे गट, मनसे, काँग्रेस तसेच इतर पक्षांनी घेतली होती. दरम्यान, सकारच्या या धोरणाला विरोध करण्यासाठी 5 जुलै रोजी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण सरकारने हिंदी सक्तीचा निर्णयच रद्द केला असला तरी हा मोर्चा होईलच. असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी मनसेचे नाव घेत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही नवे आवाहन केले आहे.

मोर्चा होणारच, पण..

राज्य सरकारने हिंदी भाषेविषयीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाचा 5 जुलै रोजीचा मोर्चा होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. याबाबतचा संभ्रम ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूर केला आहे.  येत्या 5 जुलै रोजीचा मोर्चा होणारच आहे. फक्त या मोर्चाचे स्वरुप वेगळे असेल. ही विजयी रॅली असेल किंवा अन्य दुसरे काही असेल, पण काहीही झालं तरी 5 जुलै रोजी आम्ही एकत्र जमणार आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी यावेळी सर्वच पक्षांनी या विजयी रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. सोबतच त्यांनी मनसेचा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांनाही या विजयी रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मराठी माणसाची एकजूट तुटू द्यायची नाही. संकट आल्यावरच जागं कशाला व्हायचं. झोपायचं नाही. जागं व्हा. युतीबाबत राज ठाकरेंशी माझी प्रत्यक्ष नाही पण चर्चा सुरूच आहे. आमचे नेते एकमेकांशी बोलत आहेत. पण माझी मनसे आणि सर्वांना विनंती आहे की 5 तारखेचा कार्यक्रम झाला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाचे नेमके काय होणार? ठाकरेंनी आवाहन केल्याप्रमाणे राज ठाकरे आणि त्याचा मनसे पक्ष 5 जुलै रोजीच्या मोर्चात सहभागी होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.