Uddhav Thackeray : महाविकास आघाडी कामाला लागली, आज बैठक; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार

| Updated on: Aug 23, 2022 | 10:00 AM

Uddhav Thackeray : काल एका जखमी गोविंदाचा मृत्यू झाला हे अत्यंत दुर्देवी आहे. या संदर्भात अधिवेशनात प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जखमी गोविंदांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते अजय चौधरी यांनी लावून धरली आहे.

Uddhav Thackeray : महाविकास आघाडी कामाला लागली, आज बैठक; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
महाविकास आघाडी कामाला लागली, आज बैठक; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच महाविकास आघाडीची (maha vikas aghadi) महत्त्वाची बैठक पार पडत आहे. विधीमंडळात ही बैठक पार पडणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील नेते अजित पवार (ajit pawar), जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले आदी नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत विधानसभेच्या कामकाजावर रणनीती ठरवण्यात येणार आहे. तसेच महापालिका निवडणूक, ओबीसी आरक्षण आणि राज्यातील इतर समस्यांवरही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीचे नेते अजित पवार यांनी या बैठकीची माहिती दिली. आम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार होतो. त्यांच्याशी विधानसभेच्या कामकाजाबाबत चर्चा करणार होतो. पण काँग्रेस नेत्यांनाही त्यांना भेटायचं आहे. त्यामुळे मग एकत्र भेटून बैठकच घ्यायचा निर्णय झाला. उद्धव ठाकरे यांनीही बैठकीला येणार असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे हे आघाडीतील प्रमुख नेते आहेत. महाविकास आघाडीचा एकोपा टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे सतत भेटून चर्चा करणं आवश्यक असतं. आज संध्याकाळी 6 वाजता विधीमंडळात बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अधिवेशनात प्रश्न विचारणार

काल एका जखमी गोविंदाचा मृत्यू झाला हे अत्यंत दुर्देवी आहे. या संदर्भात अधिवेशनात प्रश्न विचारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जखमी गोविंदांना मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते अजय चौधरी यांनी लावून धरली आहे. जखमी गोविंदांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांना भरीव मदत द्या

यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावरही भाष्य केलं. शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही. शेतकरी हवालदिल आहे. त्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. पिकांवरील गोगलगाईच्या प्रादुर्भावाबाबतची काल लक्षवेधी लागली होती. पूरग्रस्तांबद्दल जे काही विषय मांडले, ठिकठिकाणी नुकसान झालंय, त्यावर चर्चा झालीये. सदस्यांनी भूमिका मांडली आहे. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळालीच पाहिजे, असंही ते म्हणाले.