भाजप प्रवेश दोन दिवसांवर लांबला, तरीही बडा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबईत, घडामोडींना वेग; काय घडतंय?

कधीकाळी कोकणात मनसेचा चेहरा असणारे वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यांचा भाजपा प्रवेश मात्र रखडला आहे. ते शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबईला पोहोचले आहेत.

भाजप प्रवेश दोन दिवसांवर लांबला, तरीही बडा नेता शेकडो कार्यकर्ते घेऊन मुंबईत, घडामोडींना वेग; काय घडतंय?
vaibhav khedekar bjp joining
| Updated on: Sep 23, 2025 | 7:15 PM

Vaibhav Khedekar : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक पाहता राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कोकणात मनसे पक्षाचा विस्तार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैभव खेडेकर यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. ते भापजात प्रवेश करणार आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा असली तरी अद्याप त्यांचा प्रवेश झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार आता त्यांचा भाजपा प्रवेश आणखी दोन दिवस लांबलेला आहे. असे असले तरी आपले शेकडो कार्यकर्ते घेऊन खेडेकर मुंबईत दाखल झाले आहेत.

4 सप्टेंबरलाच होणार होता प्रवेश, पण…

मिळालेल्या माहितीनुसार वैभव खेडेकर हे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपा प्रवेशावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कोकणातून आपल्या समर्थकांना मुंबईत आणले आहे. मात्र आता त्यांचा भाजपा प्रवेश दोन दिवसांनी लांबला आहे. अगोदर त्यांचा भाजपा प्रवेश 4 सप्टेंबर रोजी होणार होता. मात्र भाजपाचे खासदार नारायण राणे हे आजारी असल्याने आणि मराठा, ओबीसी आरक्षणाच्या विषयामुळे हा पक्षप्रवेश सोहळा लांबला होता. आता हाच सोहळा आणखी दोन दिवस लांबलेला आहे.

खेडेकर रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार

याच लांबलेल्या पक्षप्रवेशावर खेडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला माहीत होतं की आज पक्षप्रवेश होणार नाही. मात्र मोठ्या संख्येत लोक आले होते म्हणून मी त्यांना घेऊन आलो. काही लोक म्हणत होते की वैभव म्हणजे कोकण नव्हे. म्हणून मी कोण आहे हे दाखविण्यासाठी या लोकांना सोबत घेऊन आलो, असे यावेळी खेडेकर यांनी सांगितले. तसेच मी भाजपाचे काम सुरू केले आहे. पक्ष प्रवेश ही फक्त औपचारिकता राहिली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मी आता काही निवडक लोकांसोबत डोंबिवली येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला जात आहे. तेथून तुम्हाला काही गोड बातमी भेटू शकते, असेही त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे आता रवींद्र चव्हाण यांच्या भेटीदरम्यान नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

4 जिल्हाध्यक्ष तसेच 350 पदाधिकाऱ्यांची यादी…

खेडेकर यांचा भाजपा प्रवेश लांबल्यामुळे काही लोकांचा तुम्हाला विरोध होत आहे का? असे विचारताच त्यांनी मला याबाबत काही सांगता येणार नाही. मी गल्लीतला कार्यकर्ता आहे. मी काही मोठा कार्यकर्ता नाही. मी 20 वर्षे मनसेचे काम केले. यापेक्षा आता दुप्पट ताकदीने भाजपाचे काम करणार आहे. मी 4 जिल्हाध्यक्ष तसेच 350 पदाधिकाऱ्यांची यादी सोबत घेऊन आलो आहे, असे सांगून माझा भाजपाप्रवेश होईल हे मात्र निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.