विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय शह, पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या वाटेवर

| Updated on: Jan 27, 2021 | 9:48 AM

वलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत (Dhawalsinh Mohite Patil Congress)

विजयसिंह मोहिते पाटील यांना राजकीय शह, पुतणे धवलसिंह काँग्रेसच्या वाटेवर
विजयसिंह मोहिते पाटील (डावीकडे) आणि पुतणे धवलसिंह मोहिते पाटील
Follow us on

पंढरपूर : भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे काँग्रेसचा हात हाती धरत आहेत. धवलसिंह मोहिते पाटील उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. (Vijaysinh Mohite Patil Nephew Dhawalsinh Mohite Patil to join Congress)

मोहिते पाटील पितापुत्र भाजपात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार आणि पक्षासोबत असलेले माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची साथ सोडली. रणजीतसिंह यांनी भाजपात प्रवेश केला, तेव्हा विजयसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या मंचावर उपस्थित होते. भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार असल्याचं विजयसिंहांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर केलं होतं. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही राष्ट्रवादीला माळशिरस तालुक्यात फटका बसला होता.

धवलसिंह मोहितेंच्या उमेदवारीची चर्चा फोल

सध्या डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह आणि रणजितसिंह यांच्यापासून दूर आहेत. काका आणि चुलत बंधू भाजपात गेल्यानंतरही विधानसभा निवडणुकीत धवलसिंहांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील यांना पक्षात खेचण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही प्रयत्न झाल्याचं बोललं जातं. धवलसिंह यांचं नाव राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत होतं.

मोहिते पाटील घराण्याला काँग्रेसचा शह

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मुंबईतील टिळक भवनमध्ये उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता पक्षप्रवेश होणार आहे. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या रुपाने सोलापूर जिल्ह्यात युवा चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांना मानणारे अनेक जुने जाणते कार्यकर्तेही पुन्हा काँग्रेसमध्ये येतील, अशी आशाही काँग्रेसच्या नेत्यांना आहे. मोहिते पाटील यांच्या घराण्यातील नेत्याला पक्षात घेऊन काँग्रेस भाजपला राजकीय शह देण्याच्या प्रयत्नात आहे.

संबंधित बातम्या :

मी कुठेही गेलेलो नाही, मी अजून राष्ट्रवादीतच : विजयसिंह मोहिते पाटील

निवडणूक लढणार नाही, भाजप देईल त्या उमेदवाराचं काम करणार : विजयसिंह मोहिते पाटील 

(Vijaysinh Mohite Patil Nephew Dhawalsinh Mohite Patil to join Congress)