शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये

| Updated on: Jul 13, 2021 | 9:43 AM

अशोक शिंदे हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे.

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये
माजी आमदार अशोक शिंदे
Follow us on

वर्धा : एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे (Ashok Shinde) हे काँग्रेसचा झेंडा हाती धरत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिंदे काँग्रेसचा झेंडा हाती धरतील.

डावलल्यामुळे अशोक शिंदे नाराज

अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

शिवसेनेच्या माजी खासदारासोबत तीव्र मतभेद

शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे (Anant Gudhe) आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.

कोण आहेत अशोक शिंदे?

अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार
1995, 1999 आणि 2009 असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव
अशोक शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद
मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद

नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश

मुंबईत आज (मंगळवार) दुपारी दोन वाजता अशोक शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले (Nana Patole) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. अशोक शिंदेही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील.

संबंधित बातम्या:

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडण्यासाठी फुल्ल परवानगी, पण शिवसेनेला हात लावायचा नाही हे ठरलंय : हसन मुश्रीफ

प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती; समितीत देसाई, पटोले आणि पाटील

(Wardha Hinganghat Shivsena Leader Ashok Shinde to join Congress in presence of Nana Patole)