शिवसेनेसोबत कोणतंही शत्रूत्व नाही, जर-तरला अर्थ नसतो, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

| Updated on: Jul 04, 2021 | 7:36 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "राजकारणात जर तरला अर्थ नसतो. परिस्थिती जी असते त्यावर निर्णय होत असतो," असं मोठं विधान केलं आहे. 

शिवसेनेसोबत कोणतंही शत्रूत्व नाही, जर-तरला अर्थ नसतो, परिस्थितीनुसार निर्णय घेऊ; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
DEVENDRA FADNAVIS
Follow us on

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या गुप्त बैठकीनंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. संजय राऊत आणि शेलार यांनी ही बैठक झाल्याचे नाकारले असले तरी अंतगर्त काहीतशी शिजत असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर शिवसेनेशी हातमिळवणी करण्याच्या विषयावर भाष्य करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी “राजकारणात जर तरला अर्थ नसतो. परिस्थिती जी असते त्यावर निर्णय होत असतो,” असं मोठं विधान केलं आहे.  तसेच शिवसेनेशी कोणतंही शत्रुत्व नाही, असेही ते म्हणाले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी बोलताना त्यांनी वरील भाष्य केले. ते मुंबईत बोलत होते. (we are not enemy decision of alliance with Shiv sena will depend on situation said Devendra Fadnavis)

अधिकृतपणे भाजपची कोणत्याही पक्षाशी भेटगाठ नाही

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. सोबतच सध्याच्या विविध नेत्यांच्या भेटसत्रांवरही त्यांनी भाष्य केलं. “कोणाच्या भेटगाठी झाल्या याबद्दल मला कल्पना नाही. अधिकृतपणे भाजपची शिवसेना किंवा कुठल्याही पक्षाशी भेटगाठ नाही. भारतीय जनता पक्ष हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतो आहे. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून लढाई करण्याची आमची तयारी आहे,” असे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेशी कोणतेही शत्रूत्व नाही

यावेळी पुढे बोलताना त्यांनी शिवसेना आणि भाजपत निर्माण झालेल्या वैचारिक मतभेदांवर भाष्य केलं. “आमच्यात शत्रुत्व कधीच नव्हतं. आमच्या वैचारिक मतभेद निर्माण झाले. कारण आमचा हात सोडून आमचे मित्र ज्यांच्याविरोधात निवडून आले त्यांचा हात पकडून निघून गेले. त्यामुळे मतभेद उभे झाले. हा धुऱ्याचा वाद नाही. आमच्यात कुठलेही शत्रूत्व नाही,” असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकारला विविध मुद्द्यांवरुन घेरण्याचा आम्ही प्रयत्न करु असे फडणवीस म्हणाले. तसेच सभागृहात प्रश्न मांडू दिले नाही तर आम्ही रस्त्यावर जनतेचे प्रश्न मांडू असेही त्यांनी निक्षून सांगितले.

इतर बातम्या :

कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

राष्ट्रवादीच्या युवा नेत्या सक्षणा सलगर यांना धमकीचा फोन, भाजप नेत्या चित्रा वाघ सक्षणा यांच्या पाठीशी

‘अधिवेशनात जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

(we are not enemy decision of alliance with Shiv sena will depend on situation said Devendra Fadnavis)