राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेमकं काय गमवलं? निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निकालामुळे काय फटका बसणार?

| Updated on: Apr 10, 2023 | 9:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने राजकीय दर्जा रद्द केल्याने राष्ट्रवादीला नेमका काय फटका बसलाय? याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेमकं काय गमवलं? निवडणूक आयोगाच्या त्या निकालामुळे काय फटका बसणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Follow us on

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस (TMC) आणि सीपीय (CPI) अर्थात भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय या तीनही पक्षांसाठी मोठा धक्का मानला जातोय. या पक्षांची राजकीय मान्यता रद्द झाल्याने त्यांनी नेमकं काय गमावलं? याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

देशात आतापर्यंत आठ राजकीय पक्षांना केंद्रीय दर्जा देण्यात आलेला होता. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांचा समावेश होता. आधी निवडणूक आयोग दर पाच वर्षांनी राष्ट्रीय दर्जा देण्याबाबतचा निर्णय घ्यायचं. पण 2014 च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांनंतर निवडणूक आयोगाने यामध्ये बदल केला. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दर दहा वर्षांनी देण्याचं निश्चित केलं. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता पुढचे दहा वर्ष राष्ट्रीय दर्जा मिळणार नाही, अशी शक्यता आहे.

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असलेल्या राजकीय पक्षांचे चिन्ह हे राखीव असतं. त्यांच्या चिन्हाचा वापर देशभरात कुणीही करु शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द झाल्याने आता त्यांचं घड्याळ चिन्ह इतर राज्यांमध्ये इतर कुणालाही मिळू शकतो. याशिवाय इतर राज्यांमध्ये निवडणूक लढवायची असल्यास राष्ट्रवादीला आता वेगवेगळे चिन्हं घ्यावे लागण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय दर्जा असलेल्या पक्षांना निवडणुकीच्या काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीवर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळते.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी पक्षाने लोकसभेच्या चार जागांवर विजय मिळवणं आवश्यक असतं. याशिवाय चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मते मिळवणे आवश्यक असतं. तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या दोन टक्के जागा जिंकणं बंधनकारक असतं किंवा चार राज्यांमध्ये पक्षाला प्रादेशिक पक्षाचा किंवा राज्य पक्षाचा दर्जा मिळणं आवश्यक असतं. या निकषांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बसत नसल्याने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला 2014 आणि 2019च्या निवडणुकीत टक्केवारी घसरली

राष्ट्रवादी काँग्रेसला 2014च्या लोकसभा निवडणुकीत 16.12 टक्के मते मिळाली होती. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 4 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं होतं. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 17.24 टक्के मतं मिळाली होती. राज्यात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी फक्त 41 जागांवर राष्ट्रवादीला यश मिळालं होतं.

त्याचप्रकारे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 15.52 टक्के मतं मिळाली होती. त्यावेळीही राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. पण त्यावेळी 2014 च्या तुलनेत मतांची टक्केवारी कमी झाली. राष्ट्रवादीला त्यावेळी फक्त 15.52 टक्के मते मिळाली होती. तसेच 2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 54 जागांवर यश मिळालेलं. राष्ट्रवादीला त्यावेळी 16.71 टक्के मतं मिळाली होती.

या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी घसरली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 16.12 टक्के मतं मिळाली होती. पण तीच टक्केवारी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 15.52 टक्क्यांवर पोहोचली होती. हीच गत विधानसभा निवडणुकीतही झाली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांची टक्केवारी ही 17.24 टक्के इतकी होती. पण 2019 मते ही टक्केवारी घसरली. 2019च्या विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदारांची संख्या जरी वाढली तरी मतांची टक्केवारी घसरली. राष्ट्रवादीला 2019च्या विधानसभा निवडणुकीत केवळ 16.71 टक्के मिळाली.