
मुंबई : (CM Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी (Shiv Sena) शिवसेनेतील आमदारांना घेऊन स्वतंत्र गटाची स्थापना केल्यानंतरही पक्ष प्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी संयमाची भूमिका घेतली होती. पण शिंदे गटात होत असलेले आऊटगोइंग पाहून सामनाच्या मुलाखती दरम्यान, ठाकरे यांनी त्यांच्यावर सडकून टिका केली आहे. यामधून त्यांचा रोष सबंध राज्यासमोर आला आहे. असे असतानाही एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र हीच खरी शिवसेना असे ठणकावून सांगितले तर जात आहेच पण आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरु असताना ते आता ज्येष्ठांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटीगाठीवर भर देत आहेत. त्यामुळे एकीकडे संघटन तर मजबूत होत आहेच पण दुसरीकडे प्रत्यक्ष भेटीगाठीतून आपणच म्हणजेच शिवसेना हे देखील पटवून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. उद्योगपती रतन टाटा यांच्या भेटीनंतर शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची भेट घेतली आहे.
जिथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आमदार, खासदार यांना भेटत नव्हते असा आरोप केला जात आहे तिथे एकनाथ शिंदे यांनी भेटी-गाठीचा धडाका सुरु केला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते अॅक्शनमोडमध्ये असून मुख्यमंत्री पदाचा कारभार संभाळत असताना संघनात्मक वाढीवरही त्यांनी भर दिला आहे. शिवाय दुसरीकडे कुणावरही टिका न करता जनतेची कामे हेच आपले ध्येय असल्याचेही ते सांगत आहे. मुख्यमंत्री पादाची शपथ घेण्यापूर्वी केवळ आमदरांचा समावेश त्यांच्या गटामध्ये झाला होता. आता खासदार, नगरसेवक एवढेच नाहीतर पदाधिकारी देखील त्यांच्याकडे जात आहेत. यातच त्यांनी आता ज्येष्ठांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केल्याने वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची भेट घेतली तर सायंकाळी ते मनोहर जोशी यांच्या भेटीला जात आहेत. या ज्येष्ठ नेत्यांचे पक्ष उभारणीसाठी मोठे योगदान असल्याचे ते सांगत आहेत. त्यांच्या योगदानाबरोबरच ज्येष्ठ नेत्यांच्या कर्तुत्वाची जाण ठेवणारे शिंदे अशी एक छाप आपोआपच निर्माण होत आहे. त्यामुळे संघटन आणि खरी शिवसेना आपलीच हेच सांगण्याचा प्रयत्न आता शिंदे हे प्रत्येक कृतीमधून दाखवून देऊ लागली आहेत. अद्याप यावर कोर्टात निर्णय होईल पण त्यांचा आत्मविश्वास आणि राजकीय खेळीतील प्रत्येक पाऊल हे काही वेगळाच संदेश देणारे आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी उद्योगपती रतन टाटा यांची भेट घेतली होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करुन ते गुरुवारी सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीला गेले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खलावलेली असते त्यामुळे आपण विचारपूस करण्यासाठी गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत तर सायंकाळी ते मनोह जोशी यांच्या भेटीला जात आहेत. त्यांच्या या भेटीगाठीमुळे शिवसेनेतील नेत्यांना आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना नेमके काय वाटत असेल हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही.