ज्या कंपनीच्या मालकासाठी फडणवीस अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात गेले ती नेमकी कुणाची?, नेमका वाद काय आहे?; वाचा सविस्तर

| Updated on: Apr 18, 2021 | 1:24 PM

रेमडेसिवीरचा साठा करून ठेवल्याबद्दल ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. (who is owner of bruck pharma company? why Devendra Fadnavis reached police station late night?)

ज्या कंपनीच्या मालकासाठी फडणवीस अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात गेले ती नेमकी कुणाची?, नेमका वाद काय आहे?; वाचा सविस्तर
nawab malik
Follow us on

मुंबई: रेमडेसिवीरचा साठा करून ठेवल्याबद्दल ब्रुक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना फैलावर घेतलं. त्यानंतर डोकानिया यांना पोलिसांनी सोडून दिलं. फडणवीस ज्या कंपनीच्या मालकासाठी अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात गेले ती कंपनी नेमकी आहे कुणाची? काय आहे हा वाद? त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा. (who is owner of bruck pharma company? why Devendra Fadnavis reached police station late night?)

कंपनीचे चेअरमन कोण? किती देशांत कंपनी फैलावली?

ब्रुक फार्मा ही औषध उत्पादन, वितरण आणि निर्यात करणारी जागतिक दर्जाची कंपनी आहे. देवेंद्र कुमार केजरीवाल हे या कंपनीचे चेअरमन आहेत. त्यांना फार्मा उत्पादनाच्या आयात, निर्यात आणि उत्पादनाचा 30 वर्षाचा अनुभव आहे. त्यांचे संपर्क आणि अनुभवाच्याद्वारे त्यांनी ही कंपनी जागतिक स्तरावर नेऊन ठेवली आहे. या कंपनीचं मुख्यालय दीव दमण येथे आहे. गेल्या दहा वर्षात या कंपनीने आपलं उत्पादन अधिक पटीने वाढवलं आहे. या कंपनीने इतर औषधांसह कॅन्सर विरोधी औषधांचीही निर्यात सुरु केली आहे. या कंपनीची स्थापना 2010मध्ये झाली होती. या कंपनीच्या अंतर्गत एकूण 60 प्रोडक्ट्स नोंदणीकृत आहेत. श्रीलंका, अफगाणिस्तान, कम्बोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, नॉर्थ सुदान, साऊथ सुदान, नायजेरीया, झाम्बिया, इथोपिया, नायजेर, चिली, पेरूसह अनेक देशात त्यांची उत्पादने जातात. राजेश डोकानिया हे या कंपनीचे संचालक आहेत.

नेमका वाद काय?

राज्यात काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा प्रचंड तुटवडा होता. राज्य सरकार त्यावेळी रेमडेसिव्ही इंजेक्शन मिळवण्यासाठी धडपड करत होते. अशातच 12 एप्रिलला भाजपचे नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे थेट दमणच्या ब्रूक फार्मा कंपनीच्या कार्यालयात पोहोचले होते. त्यावेळी कंपनीकडून भाजपच्या नेत्यांना 50 हजार इंजेक्शन्स देण्यात आली होती. ही सर्व इंजेक्शन्स आम्ही महाराष्ट्राला देणार असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते.

फडणवीस प्रचंड आक्रमक

राजेश डोकानिया यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही बाब समोर आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झाले. ते भाजपच्या नेत्यांसह थेट पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात पोहोचले. याशिवाय, त्यांनी झोन आठचे डीसीपी मंजुनाथ शिंगे यांच्याशी फोनवरुनही संपर्क साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही राजेश डोकानिया यांना अशाप्रकारे अटक करू शकत नाही, असे सांगितले. त्यांनी फक्त भाजपच्या नेत्यांना इंजेक्शन्स दिली म्हणून त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. आमच्याकडे अन्न व औषध प्रशासानाची (FDA) परवानगी होती. ठाकरे सरकारमधील मंत्र्याच्या ओएसडीने राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिल्याचाही पुरावा आमच्याकडे आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

फडणवीस काय म्हणाले?

काही दिवसांपूर्वी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दमणच्या कंपनीत रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी गेले होते. त्यावेळी कंपनीने आम्हाला केंद्राची परवानगी मिळाल्यास आम्ही रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा सर्व साठा महाराष्ट्राला द्यायला तयार आहोत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यानुसार मी केंद्र सरकारशी बोलून परवानगी घेतली होती. त्यानंतर कंपनीने काही साठा महाराष्ट्रात पाठवलाही होता. मात्र, शनिवारी दुपारच्या सुमारास ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याच्या ओएसडीने ब्रुक्स फार्माचे मालक राजेश डोकानिया यांना फोन करुन धमकी दिली. तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांच्या म्हणण्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स लगेच कशी दिलीत, असा सवाल त्यांनी डोकनिया यांना विचारला. त्यानंतर संध्याकाळी काही पोलीस कर्मचारी डोकनिया यांच्या घरी गेले आणि त्यांना उचलून इकडे आणलं. त्यामुळे मला आणि भाजपच्या नेत्यांना इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात यावे लागले, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ब्रुक्स फार्मा कंपनीने आपल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्स ही कायद्याचे पालन करुन दिली होती. त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.

दरेकरांचा घणाघात

ठाकरे सरकारमधील मंत्र्याकडून दुपारी ब्रुक कंपनीच्या मालकाला दम मारला जातो. त्यानंतर संध्याकाळी 10 ते 15 पोलीस एखाद्या दहशतवाद्याला अटक करण्यासाठी धाड टाकता त्याप्रमाणे कंपनीच्या मालकाला घरातून उचलतात. हे कोणत्या प्रकारचं विकृत राजकारण आहे, तेच कळत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

दोन विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का?: मलिक

राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर फडणवीस, दरेकर, आमदार प्रसाद लाड आणि स्थानिक आमदार पराग अळवणी पोलीस ठाण्यात पोहोचले होते. पोलिसांना काही माहिती मिळाली तर ते चौकशीसाठी बोलावत असतात. काळाबाजार रोखणं हे पोलिसांचं काम आहे. ते त्यांचं काम आहे. पण ब्रुक्स कंपनीच्या या मालकासाठी राज्यातील दोन विरोधी पक्षनेते थेट पोलीस ठाण्यात गेले. एखादी काही घटना घडली तर विरोधी पक्षनेते फोनवरून माहिती घेत असतात. पोलिसांशी चर्चा करत असतात. पण प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जात नाहीत. मात्र फडणवीस, दरेकर गेले. डोकानियाला पोलिसांनी चौकशीला बोलावलं म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण भाजप का घाबरली? फडणवीस पेशाने वकील आहेत. ते डोकानियांची वकीलपत्रं घेऊन बाजू मांडत होते की त्यांच्याशी संबंध आहेत म्हणून बाजू मांडत होते?. विरोधी पक्षनेत्यांचा डोकानियाशी संबंध काय? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.

कारवाई होणारच

हेच विरोधी पक्षनेते डोकानियाला भेटायला दीव दमणलाही गेले होते. म्हणजे महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा साठा मिळू नये म्हणून भाजपचे लोक प्रयत्न करत होते, असा आरोपही त्यांनी केला. नवाब मलिक काहीही बोलत नाही. या लोकांकडे साठा होता. तुम्हीच ट्विट करून सांगितलं होतं. सरकारने रेमडेसिवीर मागितल्यावर सरकारला हे लोक पुरवठा करत नाहीत आणि विरोधी पक्षाला द्यायला तयार होतात, यामागचे राजकारण काय? असा सवाल करतानाच दोन्ही विरोधी पक्षनेते पुरवठादाराची वकिली करण्यासाठी जातात हे योग्य नाही. कोणीही कितीही मोठा असेल आणि काळाबाजार करत असेल तर कारवाई होईल. मग कुणी कुणाची कितीही वकिली केली तरी पोलीस नियमानुसार कारवाई करणारच, असंही मलिक यांनी सांगितलं.

 

आमदार गायकवाडांची जीभ घसरली

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला. ते शनिवारी बुलडाण्यात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी अत्यंत शेलक्या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. भरसभेत संजय गायकवाड यांची जीभ घसरली. त्यामुळे आता यावरुन राजकारण रंगण्याची शक्यता आहे. केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला.

सचिन सावंतांची टीका

एका व्यावसायिकासाठी मुंबई पोलिसांवर दबाव आणणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना पाहून आश्चर्य वाटते. पोलिसांचा दोष काय? त्यांच्याकडे माहिती होती की रेमॅडेसीवीरच्या 60 हजार इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवला आहे. ज्याची माहिती दडवली आहे. निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस रात्रीसुध्दा धावले?, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. (who is owner of bruck pharma company? why Devendra Fadnavis reached police station late night?)

पोलिसांचं म्हणणं काय?

या सगळ्या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी राजेश डोकानिया यांना केवळ चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. डोकानिया यांच्याकडे 60 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा होता. त्यामुळे आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. चौकशीदरम्यान राजेश डोकानिया यांनी सर्व कायदेशीर कागदपत्रे दाखवल्यानंतर आम्ही त्यांना सोडून दिले, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. (who is owner of bruck pharma company? why Devendra Fadnavis reached police station late night?)

संबंधित बातम्या:

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र सरकारला 50 हजार रेमडेसिव्हीर इंजेक्शन, भाजपची गुजरातमधून मोठी घोषणा

(who is owner of bruck pharma company? why Devendra Fadnavis reached police station late night?)