कोणत्या पक्षात जायचं ते आठवडाभरात जाहीर करणार : नारायण राणे

| Updated on: Aug 19, 2019 | 9:39 PM

यावेळी बऱ्याच चिठ्ठ्या असतील. राष्ट्रवादीकडून ऑफर होती आणि ती आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेकडूनही ऑफर होती, असा गौप्यस्फोटही नारायण राणेंनी केला.

कोणत्या पक्षात जायचं ते आठवडाभरात जाहीर करणार : नारायण राणे
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी नुकतीच मनातली खदखद बोलून दाखवली होती. सत्ताधारी पक्षात घुसमट होते, पटलं नाही तरीही बोलता येत नाही, खासदारकीत वेळ व्यर्थ जात आहे, असं नारायण राणे (Narayan Rane) त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यात बोलले होते. आता आगामी वाटचाल आणि कोणत्या पक्षात जायचं ते येत्या आठवडाभरात जाहीर करु, असं नारायण राणेंनी स्पष्ट केलंय.

टीव्ही 9 मराठीशी बोलताना राणेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. मी कोणत्या पक्षात जाणार हे आठवडा भारत ठरवणार आहे. भाजपमध्ये जावं, की अन्य पक्षात जायचं याच्या अनेक चिठ्ठ्या पडणार आहेत. यावेळी बऱ्याच चिठ्ठ्या असतील. राष्ट्रवादीकडून ऑफर होती आणि ती आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेकडूनही ऑफर होती, असा गौप्यस्फोटही नारायण राणेंनी केला.

वाचा – नारायण राणेंनी ‘ती’ गोष्ट पुस्तकात लिहायला नको होती : शरद पवार

शरद पवारांनी मला तेव्हाही बोलावलं होतं. पण छगन भुजबळ आणि आर आर पाटील यांना वाटलं त्यांची खाती मला दिली जातील. म्हणून ते घाबरत होते आणि मी राष्ट्रवादीत येऊ नये यासाठी प्रयत्न केला. पवारांनी मला खाती दिली असती यात कोणताही वाद नाही, असंही राणे म्हणाले.

“पवारांकडे पाहून कार्यकर्त्यांनी पक्ष सोडू नये”

राष्ट्रवादीतून सध्या मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. पण किमान पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहून तरी पक्ष सोडू नका, असं आवाहन राणेंनी केलंय. एक काळ होता, जेव्हा सर्व जण काँग्रेसकडे धावत होते. पण आज ती काँग्रेस राहिलेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहत नसते, असं म्हणत त्यांनी भाजपलाही सूचक इशारा दिलाय.

“बाळासाहेबांच्या कुटुंबीयांना शोभेल असं पद शिवसेनेने घ्यावं”

दरम्यान, शिवसेनेकडून सध्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून फोकस केलं जातंय. यावरही राणेंनी उत्तर दिलं. बाळासाहेबांनी एका सामन्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपद बहाल केलं, त्यांच्या घरच्यांनी शोभेल असं पद मिळवण्याचा प्रयत्न करावा. आदित्यची मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल आणि त्यात काही गैर नाही. पण पद कोणतं हवं याचाही विचार केला पाहिजे, असं राणे म्हणाले.

शिवसेना आणि भाजप वेगळे लढतील, असा अंदाजही राणेंनी वर्तवला. भाजपने स्वबळावर निवडणूक लढवल्यास 288 पैकी किमान 160 जागा निवडून येतील आणि शिवसेना एकटी पडेल. राज्याचा कारभार एकतर्फी होईल, असं राणे म्हणाले.