मोठी बातमी! एनडीएसोबत की मविआसोबत? अखेर शरद पवारांकडून एक घाव दोन तुकडे, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि बजरंग सोनवणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आठही खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. या भेटीनंतर या खासदारांची शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं, परंतु आता अखेर शरद पवार यांनी यावर स्पष्ट भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आपण विरोधातच आहोत, जोमाने काम करा असा स्पष्ट संदेश शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना बैठकीत दिल्याची माहिती समोर आली आहे. आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये, जोमाने काम करा असं बैठकीमध्ये शरद पवार यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शरद पवार यांच्या या विधानामुळे आता महाविकास आघाडीमधील संभ्रम देखील दूर होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान या संदर्भात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील महत्त्वाचं विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 दिवसीय बैठकीत सुप्रिया सुळे यांच्याकडून महत्त्वाची बाब अधोरेखीत करण्यात आली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांकडून पक्ष एनडीए सोबत जाणार आहे का? याबाबत सवाल उपस्थित करण्यात आला होता. यावर बोलताना सुप्रिया सुळें यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनातील आपल्या सरकार विरोधी भाषणांकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आपण सभागृहात ज्या प्रकारे लढत आहोत, त्याच प्रमाणे रस्त्यावरची देखील लढाई लढायची आहे. सध्या जिल्ह्यात जी रिक्त पदे आहेत ती तातडीने भरा आणि कामाला लागा, लवकरच आपण देखील महाराष्ट्र दौरा करणार असून, लोकांच्या प्रश्नांवर ताकदीने लढा असे निर्देश यावेळी सुप्रिया सुळे यांनी जिल्हाध्यक्षांना दिले आहेत. शनिवार, आणि रविवारी पार पडलेल्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांच्याकडून विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे. आता फक्त कोकणातील जिल्हांचा आढावा बाकी आहे.