
आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेक नाती असतात, त्यातलंच एक नात असतं ते शेजाऱ्याचं. आपण जेव्हा संकटात असतो, तेव्हा आपले नातेवाईक आपल्याला मदत करतील की नाही? याचा कोणताही भरोसा नसतो. मात्र कोणतंही नातं नसताना आपले शेजारी आपल्या मदतीला धावून येतात. अगदी मध्यरात्री जरी आपल्याला कशाची गरज असेल तर शेजारीच आपल्या कामाला येऊ शकतात. त्यामुळे अशा शेजाऱ्यांना कधीही दुखावलं नाही पाहिजे. मात्र त्याचसोबत काही गोष्टींची काळजी देखील घेतली पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग आज जाणून घेऊयात शेजाऱ्यांसोबत आपला व्यवहार कसा असावा? आणि चाणक्य यांनी नेमका काय सल्ला दिला आहे? त्याबद्दल.
शत्रू मित्र सिद्धांत – चाणक्य म्हणतात माणसानं शेजाऱ्यांना कधी शत्रू मानलं नाही पाहिजे, तसेच कधीही पूर्ण मित्र देखील मानलं नाही पाहिजे. कारण या जगात जसे चांगले लोक आहेत, तसे वाईट लोक देखील असू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा अनेक शेजारी असे असतात की ते संकट काळात अगदी मध्यरात्री देखील तुमच्या मदतीला धावून येतात. तुमचे नातेवाईक साथ सोडतील पण शेजारी साथ सोडत नाही. आपल्या आयुष्यात आलेली अशी माणसं आपण जपली पाहिजे. परंतु असे देखील काही शेजारी असात ज्यांना तुमची सुरू असलेली प्रगती पहावत नाही. ते सारखा तुमचा द्वेष करतात. जर उघड -उघड शत्रूत्व घेण्याची त्यांची ताकद नसेल तर ते पडद्यामागून तुमच्याविरोधात कट कारस्थान करतात. त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहिलं पाहिजे. कोणासोबत मैत्री ठेवायची आणि कोणापासून चार हात लांब राहायचं हे जर तुम्हाला कळालं, तर तुमची प्रगती कोणीही थांबू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
साम, दाम दंड भेद – चाणक्य यांनी शेजारच्या व्यक्तीशी संबंध कसे असावेत हे सांगताना साम, दाम, दंड, भेद या चार नीती सांगितल्या आहेत. साम म्हणजे शेजाऱ्यांच्या कायम संपर्कात रहा, एखादी समस्या असेल तर ती चर्चेने सोडवा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. दाम म्हणजे चाणक्य म्हणतात तुमचा जो शेजारी आहे, त्याला कधीही काही मदत लागली तर तुम्ही त्यासाठी नेहमी तयार रहा, कारण त्यामुळे तोही संकट काळात तुम्हाला मदत करेल. दंड म्हणजे चाणक्य म्हणतात जर तुमचा शेजारी हा सतत तुमचा द्वेष करत असेल तर त्यावेळी तुम्हाला त्याच्यापासून सावध रहावं लागेल, वेळ पडली तर त्याला धडा शिकवावा लागेल. भेद म्हणजे चाणक्य म्हणतात की आपल्या विरोधात काही कट कारस्थान रचलं जात आहे का? याची माहिती आपल्याला असायलाच हवी.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)