Chanakya Niti : नवीन व्यवसाय सुरू करताय? मग या गोष्टी कायम लक्षात ठेवा, चाणक्य यांनी सांगितला बिझनेस मंत्र
अनेकांच्या मनात अशी इच्छा असते, की आपण देखील काहीतरी व्यवसाय सुरू करावा, तो यशस्वीरित्या चालावा आणि त्यातून आपल्याला मनासारखी आर्थिक प्राप्ती व्हावी. परंतु जेव्हा आपण व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो, तेव्हापासूनच आपण काही छोट्या-छोट्या चुका देखील करतो, त्याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, सोबतच ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आपल्या आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैसा कुठे खर्च करावा? पैसा कुठे जपून वापरावा? याबद्दल अनेक गोष्टी त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात अनेक जण असा विचार करतात की, आपण एखादा चांगला व्यवसाय सुरू करू, त्याच्या माध्यमातून चार पैसे कमवू परंतु सगळेच लोक व्यवसायात यशस्वी होतात असं नाही, अनेक जण प्रचंड शिकलेले असतात, परंतु ते व्यवसायामध्ये अयशस्वी होतात, तर काही लोकांचं जेमतेम शिक्षण झालेलं असतं, त्यांना पुरेसं ज्ञान देखील नसतं मात्र तरी देखील असे लोक व्यवसायात यशस्वी होतात, असं का होतं? तर जे लोक व्यवसायात यशस्वी होतात, त्यांच्याकडे काही खास प्रकारच्या क्वालिटी असतात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
योजना गुप्त ठेवा – चाणक्य़ म्हणतात जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यवसायाची आयडिया सुचते तेव्हा तिचं प्रत्यक्षात व्यवसायात रूपांतर होईपर्यंत त्याबद्दल कोणालाही सांगू नका, अगदी तुमच्या कितीही जवळचा माणूस असेल त्याला देखील सांगू नका, कारण यामुळे तुमचा व्यवसाय सुरू होण्यापूर्वीच संकटात सापडू शकतो, तुमचे हित शत्रू तुमच्या व्यवसायाच्या उभारणीमध्ये बाधा आणू शकतात. त्यामुळे योजना या नेहमी गुप्त ठेवाव्यात असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
भांडवल – चाणक्य म्हणतात व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात तुमच्याकडे किती भांडवल आहे, त्याचा आधी विचार करावा. जेवढं भांडवलं आहे, त्यातील थोडे पैसे शिल्लक ठेवावेत. कारण व्यवसायामध्ये कधी-कधी अचानक गरज लागू शकते, अशा संकट काळात हे पैसे कामाला येतात. त्यामुळे तुमच्या हातात असलेलं संपूर्ण भांडवलं हे व्यवसायात लावू नका, काही पैसे हातात ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
ग्राहक जोडा – चाणक्य म्हणतात कोणत्याही व्यवसायाचा जीव हा त्या व्यवसायाचे ग्राहक असतात, त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक जोडा, ग्राहकांचा कधीही अपमान करू नका, त्यांचा सन्मान करा. व्यवसायिकांनी नेहमी आपल्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवावी. जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे ग्राहक म्हणून आला तर तो कधीही नाराज होणार नाही याची काळजी घ्या, त्याने पुन्हा आपलीच वस्तू विकत घेतली पाहिजे, याकडे व्यवसायिकांचं लक्ष हवं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)