
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य हे एक अर्थतज्ज्ञ असल्यामुळे माणसानं आयुष्यात पैशांचं नियोजन कसं करावं? पैशांची बचत कशी करावी? आपल्या कामाचा योग्य मोबदला कसा मिळवावा? जर कामाचा योग्य मोबदला मिळत नसेल तर काय करावं? याबद्दल त्यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यामध्ये कोणती कौशल्य असायला हवीत, तसेच तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर एक व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे कोणते गुण असायला हवेत याबद्दल देखील चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात तुम्ही जर व्यावसाय सुरू करणार असाल तर सर्वात आधी तुम्ही नम्र असणं आवश्यक आहे. ग्राहक हेच आपलं दैवत आहे, असा भाव हा व्यावसायिकाच्या मनात असायला हवा, तर आणि तरच तो व्यक्ती त्याच्या व्यावसायामध्ये प्रगती करू शकतो. जाणून घेऊयात एका व्यावसायिकामध्ये कोणते गुण असायला हवेत? त्याबद्दल.
व्यवहारामध्ये गोडवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जेव्हा कोणताही व्यवसाय सुरू करता, तेव्हा सर्वात आधी एक गोष्ट लक्षात घ्या ग्राहक हेच तुमचं दैवत आहे. कारण ग्राहक वाढले तरच तुमचा व्यवसाय देखील वाढणार आहे. जेवढा तुमचा व्यवसाय वाढेल तेवढा तुम्हाला नफा अधिक होईल, तुमची प्रगती होईल, त्यामुळे तुमच्या व्यवहारामध्ये गोडवा असणं गरजेचं आहे, आपल्याकडे आलेल्या कोणत्याही ग्राहकाचा अपमान होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्षं देणं गरजेच आहे.
शिस्त – चाणक्य म्हणतात कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वात प्रथम कोणत्या गोष्टीची गरज असते तर ती म्हणजे शिस्त, जर तुमच्या अंगी शिस्त नसेल तर तुम्ही व्यवसायच काय कोणतीच गोष्ट योग्य पद्धतीने करू शकणार नाहीत. त्यामुळे शिस्त ही व्यवसायामध्ये अत्यंत गरजेची असते, यामध्ये आर्थिक शिस्तीचा देखील समावेश होतो, व्यवसायामध्ये आर्थिक शिस्त अत्यंत आवश्यक असते. तरच तुमची प्रगती होईल.
नम्रता – चाणक्य म्हणतात व्यावसायिकाने नेहमी नम्र असलं पाहिजे, कुठलाही व्यवसाय करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली पाहिजे, तर आणि तरच तुम्ही व्यावसायामध्ये प्रगती करू शकता. व्यावसायिकाचा व्यवहार आपल्या ग्रहाकांसोबत नेहमी नम्र असला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)