
प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. या ठिकाणी गर्दी थांबता थांबत नाहीये. आतापर्यंत सुमारे 60 कोटी भक्तांनी संगमच्या पवित्र पाण्यात स्नान केले आहे. तरीदेखील असे अनेक कुटुंब आहेत जे महाकुंभला जाऊ शकले नाहीत. अशाच एका कुटुंबाचे उदाहरण मध्यप्रदेशच्या भोपालमधून समोर आलं आहे. या कुटुंबातील एक तरुण मुलगी कुटुंबाला न सांगताच कुंभकडे निघाली. पण ती असा ठिकाणी पोहोचली की… या घटनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे. काय घडलं असं नेमकं?
भोपालच्या आनंद नगर वीज कॉलनीत राहणारी एक तरुणी आपल्या घरच्यांना न सांगता महाकुंभसाठी निघाली. यासाठी ती घरातून एकटीच स्टेशनला गेली आणि ट्रेन पकडली. पण रेल्वे स्टेशनवर तिला चुकीच्या ट्रेनमध्ये बसवले गेले, ज्यामुळे ती प्रयागराजऐवजी इतर ठिकाणी पोहोचली. तर,दुसरीकडे, घरातून मुलगी गायब झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. वडिलांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दिली. अखेरीस ती कानपूरजवळ गोविंदपुरी रेल्वे स्टेशनवर सापडली.
एकटीच फिरत असलेली मुलगी गोविंदपुरी रेल्वे स्टेशनवर गांगरल्या सारखी फिरत होती. रेल्वे पोलिसांची नजर तिच्यावर पडली. ही मुलगी गांगरल्याचं दिसल्याने पोलिसांना शंका आली. ती एकटीच इथे तिकडं फिरत होती. पोलिसांनी तिला विचारले, तेव्हा समजले की ती एकटीच आहे आणि महाकुंभासाठी आपल्या घरातून निघाली होती. त्यानंतर तिच्या घरच्यांच्या नंबरवरून आरपीएफने तिच्या वडिलांना कॉल केला. कॉलवरून कळले की तिच्या विरुद्ध भोपालमध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आली होती.
राजकुमार लोधी यांची ही मुलगी सुरुवातीपासून महाकुंभला जाण्याचा हट्ट धरून बसली होती. पण गर्दी पाहता, कुटुंबीयांनी तिला नकार दिला होता. त्यानंतर, रविवारी मुलगी एकटीच महाकुंभासाठी निघाली. ती एकटीच रेल्वे स्टेशनला गेली आणि चुकीच्या ट्रेनमध्ये बसून गोविंदपुरीला पोहोचली. पोलिसांनी या मुलीचा ताबा चाइल्डलाइनला दिला आहे. आता तिचे वैद्यकीय तपासणी करून ती कुटुंबाच्या ताब्यात दिली जाईल.