
बिजनौर : उत्तर प्रदेशामधील बिजनौर येथे राम चौराहा नावाचा चौक आहे. येथे असलेल्या हनुमान मंदिराला बरीच ओळख आहे. हनुमानजी येथे पंच मुखी अवतारात विराजमान आहेत. असे मानले जाते की बजरंगबलीने पंचमुखी अवतार घेऊन रावणाचा भाऊ अहिरावण मारला होता. हनुमानजींच्या पंचमुखी (Panchmukhi Hanuman) अवतारात पहिला चेहरा वानराचा, दुसरा गरुडाचा, तिसरा वराहचा, चौथा नरसिंहाचा आणि पाचवा घोड्याचा आहे. या पाचही चेहऱ्यांचे स्वतःचे महत्त्व आहे. असे म्हणतात की या मंदिरात पवनपुत्र आपल्या पंचमुखी रूपाने आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात. हनुमान जयंतीला (Hanuman Jayanti 2023) येथे भक्तांची विशेष गर्दी असते. उद्या 6 एप्रिल 2023 ला मंदीरात विशेष पुजा करण्यात येणार आहे.
या मंदिरात दररोज भाविकांची वर्दळ असली तरी मंगळवारी आणि शनिवारी मंदिरात विशेष पूजा असते. त्यामुळे भाविक दूरदूरवरून मंदिरात प्रसादासाठी पोहोचतात. हे मंदिर 300 वर्षे जुने आणि अतिशय चमत्कारिक असल्याचे भाविक सांगतात. येथे प्रसाद अर्पण करून हनुमान चालिसाचे पठण केल्याने बाबांच्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि वाईट शक्तींचा प्रभाव दूर होतो.
मंदिरात भाविकांकडून किती प्रमाणात प्रसाद दिला जातो, याचा अंदाज मंदिराजवळील दुकानातील मिठाईच्या विक्रीवरून लावता येतो. मंदिराशेजारी सुमारे 50 मिठाईची दुकाने आहेत. माहेश्वरी मिठाईचे मालक एकांश माहेश्वरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या दुकानात दररोज सुमारे दोन क्विंटल पेढा आणि बुंदी गुलदाणा तयार होतो. दुसरीकडे, मंगळवार आणि शनिवारी सुमारे पाच क्विंटल प्रसाद तयार केला जातो, भक्तांची मारूतीरायावर इतकी अतूट श्रद्धा आहे की हा सर्व प्रसाद झटपट विकला जातो. पंचमुखी मंदिर समितीचे अध्यक्ष अखिल अग्रवाल यांनी सांगितले की, 1988 मध्ये मंदिर परिसराची दुरुस्ती करण्यात आली होती. हे मंदिर सुमारे 300 वर्षे जुने आहे.
रामायणाच्या संदर्भानुसार, युद्धाच्या वेळी रावणाचा मायावी भाऊ अहिरावण याने भगवान राम आणि लक्ष्मण यांना बेशुद्ध करून पाताळ लोकात नेले होते. अहिरावणाने पाताळात पाच दिशांना दिवे लावले होते. खरे तर त्याला वरदान होते की जोपर्यंत हे पाच दिवे एकत्र विझवत नाहीत तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकणार नाही. अहिरवाणाचा हा भ्रम संपवण्यासाठी हनुमानजींनी पंचमुखी अवतार घेतला.
हनुमानजींनी पाचही दिवे एकत्र पाच दिशांना तोंड करून विझवून अहिरवाणाचा वध केला होता. अहिरावणाचा वध केल्यावर हनुमानजींनी आपले प्रभू श्री राम आणि लक्ष्मण यांना पाताळ लोकातून मुक्त केले होते.असे म्हणतात की जो येथे खऱ्या मनाने प्रसाद देतो त्याच्या सर्व मनोकामना भगवंत पूर्ण करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)