
गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गुरूदक्षिणा दिल्याचे समोर आले आहे. 3 दिवसांमध्ये तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक दान जमा झाले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते. यातील भक्तांना रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने अशा वस्तू दान केल्या आहेत.

साईंच्या दक्षिणापेटीत 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 रुपयांचे दान जमा झाले आहे, तर देणगी काऊंटरवर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये जमा झाले आहेत.

सशुल्क पास देणगीतून 55 लाख 88 हजार 200 रुपये मिळाले आहेत. तर डेबीट-क्रेडीट कार्ड ,ऑनलाईन देणगी , चेक, डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून 2 कोटी 5 लाख 76 हजार 626 रुपयांचे दान जमा झाले आहे.

याशिवाय 57 लाख 87 हजार 925 रुपये किमतीचे 668 ग्रॅम सोने, 5 लाख 85 हजार 879 रुपये किमतीची 800 ग्रॅम चांदी असे एकूण 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपयांची देणगी साईंच्या चरणी जमा झाली आहे.