Shani Shingnapur: पुरात वाहून आले होते शनीदेव, आश्चर्यकारक आहेत शिंगणापूरच्या ‘या’ गोष्टी

असे म्हटले जाते की, कोणी चोरीच्या उद्देशाने एखाद्याच्या वस्तूला हात लावला तरी शनिदेव त्याला आपल्या पद्धतीने शिक्षा देतात. दरवाजे आणि दाराच्या चौकटी नसतानाही येथे चोरी न होण्यामागे शनिदेवाची कृपा मानतात.

Shani Shingnapur: पुरात वाहून आले होते शनीदेव, आश्चर्यकारक आहेत शिंगणापूरच्या या गोष्टी
शनि शिगणापूर
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 04, 2023 | 10:22 AM

मुंबई, संपूर्ण भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आहेत, परंतु शनिदेवाची तीन स्थाने आहेत जी सिद्धपीठ म्हणून ओळखली जातात. हे सिद्धपीठ शनि शिंगणापूर (महाराष्ट्र) (Shani Shingnapur), कोकिळा वन (वृंदावन) आणि ग्वाल्हेर (गोमतीच्या काठावर) आहेत. या तिघांमध्ये शनी शिंगणापूरला सर्वाधिक मान्यता आहे. शनिदेवाचे हे अनोखे मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. साई तीर्थ शिर्डी ते शिंगणापूर हे अंतर 40 किमी, पुण्यापासून 158 किमी, नाशिकपासून 130 किमी आणि मुंबईपासून 280 किमी आहे. जवळचे विमानतळ पुणे आणि मुंबई आहेत. शिंगणापूर तीर्थाची गाथा खूप रंजक आहे. शनी शिंगणापूर गावाच्या आजूबाजूला डोंगर रांगा आहेत. येथे गावकरी घरांना कुलूप लावत नाहीत. घरांना, दुकानांना दरवाजेसुध्दा नाहीत.

असे म्हटले जाते की, कोणी चोरीच्या उद्देशाने एखाद्याच्या वस्तूला हात लावला तरी शनिदेव त्याला आपल्या पद्धतीने शिक्षा देतात. दरवाजे आणि दाराच्या चौकटी नसतानाही येथे चोरी न होण्यामागे शनिदेवाची कृपा मानतात.

 

अशा प्रकारे शनीदेव झाले प्रकट

शनि शिंगणापूरच्या इतिहासाशी संबंधित गाथा अतिशय रंजक, अद्भुत आणि रोमांचक आहे. शनिदेवाच्या स्वयंप्रकट स्वरूपाच्या अनेक कथा या भागाशी निगडित आहेत. इथून जवळच पानस नावाचा नाला वाहतो असे म्हणतात. सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी या भागात मुसळधार पाऊस झाला होता. त्याचवेळी नदीला पूर आला त्यात काळ्या दगडाची मूर्ती वाहून आली आणि बोराच्या झाडाला अडकून थांबली.

गावातील लोकं गुरे चरायला गेले असता त्यांना एक मोठा काळा दगड दिसला. गावकऱ्यांनी दगडाला काठीने स्पर्श केल्यावर त्यांच्या स्पर्शामुळे दगडातून रक्त वाहू लागले आणि त्यात मोठे छिद्रही पडले. दगडातून रक्त येत असल्याचे पाहून ग्रामस्थ घाबरले आणि त्यांनी आपली गुरे तेथेच सोडून पळ काढला. गावात पोहोचल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटना सांगितली तेव्हा हा चमत्कार पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती.

असे म्हणतात की, त्याच रात्री शनिदेवाने एका व्यक्तीला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की मी तुझ्या गावात प्रकट झालो आहे, माझी गावात स्थापना करा.

दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने गावकऱ्यांना हा प्रकार सांगितल्यावर ते बैलगाडी घेऊन मूर्ती घेण्यासाठी गेले. सर्वांनी मिळून जड मूर्ती बैलगाडीवर ठेवण्याचा प्रयत्न केला पण मूर्ती हलली नाही. प्रयत्न निष्फळ झाल्यावर ते सर्व गावाकडे परतले.

दुसऱ्या दिवशी रात्री शनिदेव पुन्हा त्याच व्यक्तीला दर्शन देऊन म्हणाले की, जे सख्खे मामा-भाचे आहेत, तेच मला उचलून  घेऊन येतील, तरच मी गावी येईन. दुसऱ्या दिवशीही तसाच पुढाकार घेण्यात आला. स्वप्न सत्यात उतरले. मूर्ती गावात सहज आणून बसवण्यात आली.

मंदिराला छत नाही

शिंगणापूरमध्ये स्थापित शनिदेवाच्या मूर्तीवर छत नाही. शनिदेवाची मूर्ती खुल्या आकाशाखाली आहे. भगवान शनिदेव कोणाचेही वर्चस्व स्वीकारत नाहीत. आज ज्या ठिकाणी शनिदेवाचे व्यासपीठ आहे, त्यांच्या उत्तर दिशेला कडुलिंबाचे मोठे झाड आहे. त्याची कुठलीही फांदी मोठी होऊन शनीदेवावर सावली पडण्याचा प्रयत्न केला तर ती आपोआप तुटून पडते, असे म्हणतात.

येथे येणारे भाविक भगवे वस्त्र परिधान करून पूजेसाठी तेल, काळे तीळ आणि काळे उडीद अर्पण करतात. येथे एक विशेष विहीर आहे, ज्याच्या पाण्याने भगवान शनींना स्नान घालतात. त्या विहिरीचे पाणी इतर कोणत्याही कामासाठी वापरले जात नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)