
हिंदू धर्मामध्ये पूजेचं खास महत्त्व आहे. अनेक लोकांची तर अशी इच्छा असते की देवाचं नाव सतत आपल्याजवळ असलं पाहिजे. जर तुम्ही वाहनांबद्दल बोलत असाल तर अनेक जण आपल्या गाडीच्या डॅशबोर्डवर देवाचं एखादं नाव किंवा फोटो लावतात. तर काही लोक आपल्या कारमध्ये किंवा इतर वाहनांमध्ये देवाची मूर्ती ठेवतात. काही जण आपल्या वाहनाच्या बाहेरील बाजूस देवाचं नाव छापतात. आता असं करणं खरंच योग्य आहे का? याबाबत प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनात सल्ला दिला आहे, चला तर मग जाणून घेऊयात गाडीवर देवाचा फोटो किंवा नावं लावणं योग्य आहे का? प्रेमानंद महाराज नेमकं काय म्हणतात?
यावर बोलताना प्रेमानंद महाराज म्हणाले की, आपण घरात कोणतीही नवी वस्तू आणली, गाडी आणली, सायकल आणली तरी आपण त्याची पूजा करतो, ही हिंदू संस्कृती आहे. मात्र तुम्ही जेव्हा तुमच्या नव्या वाहनावर देवाचा फोटो किंवा नाव छापता ते अत्यंत चुकीचं आहे. कारण तुम्ही जेव्हा तुमची गाडी धुता तेव्हा ते पाणी तुमच्या पायाखाली येते, अर्थात त्याच पाण्याने तुमच्या वाहनाला लावलेल्या देवाच्या प्रतिमेचं देखील स्नान झालेलं असतं. तसेच तुम्ही तुमच्या गाडीला एखादं धार्मिक स्टिकर लावता, कालातंराने ते कुठेही पडतं. त्यामुळे अशा परिस्थितीत गाडीवर कुठल्याही प्रकारची देवाची प्रतिमा किंवा नाव लावणं हे अत्यंत चुकीचं आहे.
कारमध्ये मूर्ती ठेवावी का?
याबाबत बोलताना प्रेमानंद महाराज म्हणतात की तुम्ही जर तुमच्या कारमध्ये एखादी देवाच्या मूर्ती ठेवत असाल तर ते शुभ आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळते, मात्र तुम्ही जर तुमच्या गाडीच्या समोर देवाचा फोटो किंवा नाव छापत असाल तर ते चुकीचं आहे, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)