
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच मार्गदर्शन करण्यात आलेलं नाहीये, तर घरात निर्माण झालेला वास्तुदोष कसा दूर करायचा याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. अनेकदा असं होतं की आपल्या घरात काहीही कारण नसताना अचानक भांडणं सुरू होतात. पती-पत्नीचं पटत नाही. घर सतत अशांत राहातं आणि त्याचा परिणाम हा मुलांच्या मानसिकतेवर देखील होतो. या मागे घरात निर्माण झालेला वास्तुदोष कारणीभूत असू शकतो. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच माशाच्या मूर्ती संबंधित एक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. जर घर अंशात असेल, घरात कायम आर्थिक समस्या जाणवत असतील तर घरात माशाची मूर्ती ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
वास्तुदोष दूर होतो – जर तुमच्या घराच्या उत्तर दिशेला किंवा उत्तर पूर्व दिशेला वास्तुदोष असेल तर त्याचा प्रचंड नकारात्मक परिणाम हा तुमच्यावर होतो. जर घराच्या उत्तर दिशेला वास्तुदोष असेल तर घरात कधीही पैसा टिकत नाही. कारण उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असते. त्यामुळे जर उत्तर दिशेचा वास्तुदोष दूर करायचा असेल तर उत्तर दिशेला माशाची मूर्ती ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. कारण मासा हा नेहमी गतिशील असल्यामुळे तो प्रगतीचं प्रतिक मानला जातो.
आर्थिक समस्या दूर होतात – माशाला आर्थिक समृद्धीचं प्रतिक मानलं गेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही आर्थिक समस्या जाणवत असतील तर उत्तर दिशेला चांदीचा, पितळाचा किंवा स्फटिकाचा मासा ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतील.
शैक्षणिक प्रगती – जर तुमच्या मुलांना अभ्यासासंदर्भात काही समस्या जाणवत असतील तर मुलांच्या बेडरूममध्ये किंवा अभ्यासाच्या टेबलावर चांदीचा मासा ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. यामुळे मुलांना अभ्यासात जे अडथळे येत आहेत, ते दूर होऊन तुम्हाला त्यांच्या अभ्यासात प्रगती पहायला मिळू शकते.
घरात वाद – जर तुमच्या घरात सतत वाद होत असतील तर तुम्ही तुमच्या घरामध्ये माशाची एक मूर्ती ठेवू शकतात. यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतील, घरात शांतता निर्माण होण्यास मदत होईल, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)