किचनमध्ये जाताच राग येतोय, चिडचीड होतेय? वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवसभराच्या थकव्यानंतर किचनमध्ये उभं राहून काम करणं फार थकवणारं असतं. पण किचनमध्ये सकारात्मक वातावरण असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे वास्तूनुसार स्वयंपाक करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...

आजच्या धावपळीच्या जीवनात रोजच्या तणावातून पूर्णपणे सुटका मिळवणं सोपं नाही. त्यामुळे, स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी काही वेळ आपलं मन शांत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या श्रद्धेनुसार मंत्राचा जप करणं, प्रार्थना करणं किंवा आपले आवडतं भजन ऐकल्याने मनाला शांती मिळू शकते आणि तुम्हाला सकारात्मक वाटू शकते. ज्यामुळे किचनमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला राग किंवा तुमची चिडचीड होणार नाही. सांगायचं झालं तर, भारतीय परंपरेनुसार, स्वयंपाक करताना मन शांत आणि सकारात्मक ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. कारण स्वयंपाकघरात तयार केलेले अन्न कुटुंबाला दिवसभर लागणारी ऊर्जा देतं.
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे घरातील एक महत्त्वाचं स्थान मानलं जातं. असं देखील म्हणतात की, ज्या भावनेने आणि मनःस्थितीने अन्न तयार केलं जातं, त्याचा परिणाम ते अन्न खाणाऱ्या व्यक्तीच्या मनावरही होऊ शकतो. अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावावर अन्नाची चव आणि त्याचे परिणाम अवलंबून असतात. त्यामुळे, स्वयंपाक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. अशात महत्त्वाचे वास्तु नियम जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार, असं सांगितलं जातं की, स्वयंपाक करताना राग, चिडचिड आणि तणाव टाळावा. जेव्हा मन अशांत असतं, तेव्हा नकारात्मकता तयार केलेल्या अन्नात प्रवेश करू शकते आणि त्याचा कौटुंबिक वातावरणावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, स्वयंपाक करताना मन शांत ठेवा आणि छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडण किंवा वाद टाळा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्वयंपाकघरात मोठ्याने बोलणं, वाद घालणं किंवा असभ्य भाषा वापरणं योग्य मानलं जात नाही. स्वयंपाक करताना स्वयंपाकघरातील वातावरण शांत आणि सकारात्मक असावं, अशी एक पारंपरिक धारणा आहे. त्यामुळे, जर तुम्ही स्वयंपाकघरात कोणाशी बोलत असाल, तर हळू आणि प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून घरात एक सुखद वातावरण टिकून राहील.
स्वयंपाकाबरोबरच, अन्न वाढण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची मानली जाते. प्रेमाने आणि हसून अन्न वाढल्याने कुटुंबातील सदस्यांमधील नातेसंबंध अधिक घट्ट होऊ शकतात. अन्न केवळ भूक भागवण्यासाठी नसते, तर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आणि नात्यांमधील प्रेम व आपुलकी वाढवण्याची एक सुंदर संधी देखील असते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)