Vastu Tips : घरात सात धावत्या घोड्यांचे चित्र लावताय? दिशा आणि जागेबाबत अजिबात करू नका ‘या’ चुका
आजकाल अनेक घरांमध्ये सात धावत्या घोड्यांचे चित्र पाहायला मिळते. वास्तुशास्त्रानुसार, घरात सात घोड्यांचे चित्र लावण्यासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. हे चित्र लावताना योग्य दिशा आणि जागेची निवड करणे महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे हे नियम दुर्लक्षित करू नयेत.

आजकाल अनेक घरांमध्ये सात धावत्या घोड्यांचे चित्र लावलेले पाहायला मिळते. वास्तुशास्त्रानुसार, हे चित्र घरात लावल्याने सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात, अशी मान्यता आहे. सात घोड्यांना सूर्यदेवाच्या रथाचे, सात रंगांचे आणि निरंतर गतीचे प्रतीक मानले जाते. मात्र, घरात हे चित्र लावताना त्याची दिशा, रंग, घोड्यांची स्थिती आणि जागा यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
चुकीच्या पद्धतीने लावलेले चित्र शुभ मानले जात नाही. त्यामुळे सात घोड्यांचे चित्र घरात लावताना कोणते नियम पाळावेत आणि कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घेऊया.
सात घोड्यांचे चित्र कसे असावे?
वास्तुशास्त्रानुसार, सात घोड्यांचे चित्र निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चित्रात सातही घोडे पूर्ण आणि स्पष्ट दिसले पाहिजेत. कोणताही घोडा अर्धवट किंवा झाकलेला नसावा. पांढऱ्या रंगाच्या घोड्यांचे चित्र निवडणे शुभ मानले जाते. सर्व घोडे उत्साही आणि पुढे धावत असल्याचे दिसावे. त्यांच्या गळ्यात लगाम किंवा साखळी नसावी. तसेच उगवत्या सूर्याची किंवा शांत वातावरणाची पार्श्वभूमी असलेले चित्र निवडावे. अंधार किंवा वादळाचे दृश्य असलेले चित्र टाळावे.
सात घोड्यांचे चित्र लावताना या चुका टाळा
वास्तुशास्त्रानुसार, सात घोड्यांचे चित्र बेडरूम, बाथरूम, टॉयलेट किंवा स्टोअररूममध्ये लावू नये. त्याऐवजी लिव्हिंग रूम, स्टडी रूम किंवा वर्क एरियामध्ये लावणे योग्य मानले जाते. चित्रातील घोड्यांचे तोंड घराच्या किंवा खोलीच्या आतील बाजूला असावे. तसेच चित्र अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा जड सामानाच्या मागे लावू नये. घोडे प्रसन्न आणि ऊर्जेने भरलेले दिसावेत. उदास, रागीट, थकलेले किंवा बांधलेले घोडे असलेले चित्र टाळावे.
सर्व घोडे एकाच दिशेने धावताना दिसावेत
सात घोड्यांचे चित्र निवडताना सर्व घोडे एकाच दिशेने धावताना दिसत आहेत की नाही, हे तपासावे. प्रत्येक घोड्याची आकृती स्पष्ट असावी. कोणताही घोडा धूसर किंवा अर्धवट दिसणारे चित्र निवडू नये. याशिवाय चित्राची फ्रेम आणि फोटो स्वच्छ व सुस्थितीत असावा. धूळ साचलेले, फाटलेले किंवा तुटलेले चित्र घरात लावणे टाळावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)