कैलास पर्वतावर आजवर कोणी चढू शकले नाही, का? जाणून घ्या या रहस्यमय ठिकाणाची खरी कहाणी
कैलास पर्वत हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांसाठी केवळ एक पर्वत नसून एक पवित्र शक्तिकेंद्र मानलं जातं. तिबेटमध्ये स्थित असलेल्या या पर्वताला घेऊन अनेक श्रद्धा आणि रहस्य जोडलेले आहेत. विशेष म्हणजे, माउंट एवरेस्टपेक्षा उंचीने कमी असलेला हा पर्वत आजवर कोणालाही सर करता आलेला नाही.

कोविड-१९ नंतर तब्बल पाच वर्षांनी ३० जून २०२५ पासून पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रा सुरू होणार आहे. ही यात्रा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. पण कैलास पर्वत केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर त्याच्याशी निगडित अनेक रहस्यमय गोष्टींमुळेही चर्चेचा विषय आहे. एवढंच नव्हे, तर हा पर्वत उंचीने एव्हरेस्टपेक्षा कमी असूनही आजवर कोणीही त्याच्या शिखरावर पोहोचू शकलेले नाही. यामागे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारणे सांगितली जातात.
का कोणी पोहोचू शकत नाही कैलासच्या शिखरावर?
कैलास पर्वताची उंची ६,६३८ मीटर असून माउंट एव्हरेस्टच्या ८,८४८ मीटर उंचीपेक्षा लहान आहे. तरीदेखील आजपर्यंत कोणालाही कैलासचे शिखर सर करता आलेले नाही. १९२६ मध्ये ब्रिटिश मोहिम आणि २००१ मध्ये जपानी संघाने प्रयत्न केले, पण अचानक हवामान बदल, आजार आणि विचित्र घटनांमुळे त्यांना माघार घ्यावी लागली. लोकांचा विश्वास आहे की, कैलास पर्वतावर एक अदृश्य ऊर्जा आहे, जी विशिष्ट बिंदूनंतर कुणालाही पुढे जाऊ देत नाही. चीन सरकारने धार्मिक भावनांचा आदर ठेवून येथे चढाई करण्यास बंदी घातली आहे.
पिरॅमिडसारखा आकार
कैलास पर्वताचा आकार चारही बाजूंनी सममित असून पिरॅमिडसारखा दिसतो. वैज्ञानिकांच्या मते, हा आकार निसर्गनिर्मित असून हिमनद्यांच्या हालचालीमुळे तयार झाला आहे. परंतु इतकी परिपूर्ण सममिती असलेली रचना जगात क्वचितच पाहायला मिळते. काही शास्त्रज्ञ याचा संबंध मिसरमधील पिरॅमिड्स आणि स्टोनहेंजसारख्या प्राचीन उर्जास्रोतांशी जोडतात. तिबेटी बौद्ध धर्मात तर कैलास पर्वताला “अक्ष मुंडी” म्हणजे ब्रह्मांडाचे केंद्र मानले जाते.
मानसरोवर आणि राक्षस तलाव
कैलास पर्वताजवळ दोन तलाव आहेत एक मानसरोवर (मीठं पाणी) आणि दुसरा राक्षस तलाव (खारट पाणी). धार्मिक मान्यतेनुसार मानसरोवर हे अत्यंत पवित्र मानले जाते, तर राक्षस ताल हे अपवित्र समजले जाते कारण येथे रावणाने तप केला होता. वैज्ञानिकांच्या मते, हे दोन तलाव पूर्वी एकमेकांशी जोडलेले होते, पण भूगर्भीय घडामोडींमुळे वेगळे झाले. परंतु दोन्ही ठिकाणी पाण्याचे रासायनिक गुणधर्म एवढे वेगळे का आहेत, याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही.
कैलासचा रहस्यमय ‘दर्पण’
कैलासच्या दक्षिण भागात एक गुळगुळीत भिंत आहे, जी सूर्यप्रकाशात आरशासारखी चमकते. हिमालयात अशा प्रकारची भिंत अन्यत्र कुठेही आढळत नाही. काही संशोधकांचे मत आहे की हे हिमनदीद्वारे घडलेले निसर्गाचे पॉलिशिंग असावे, मात्र यामागील नेमकं कारण अजूनही अस्पष्टच आहे.
काही यात्रेकरूंनी सांगितले की कैलास परिसरात त्यांना वेळेच्या प्रवाहात बदल झाल्यासारखा अनुभव आला. काहींनी सांगितले की काही तासांतच त्यांच्या नखांची व केसांची वाढ झालेली दिसली. १९९९ मध्ये रशियन शास्त्रज्ञ डॉ. अर्न्स्ट मुलदाशेव यांनी केलेल्या एका मोहिमेदरम्यान त्यांनी कैलासच्या आतून आवाज येत असल्याचे नमूद केले होते आणि त्यांनी सांगितले की काही पर्वतारोहक इथे थोडा वेळ थांबल्यावर वयस्कर दिसायला लागले.
