
हिंदू धर्मात गणेशत्सवाचे विशेष महत्व आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि परदेशातही काही ठिकाणी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे उत्साहात, वाजत गाजत घरी स्वागत केले जाते. 10 दिवसांपर्यंत चालणाऱ्या .या उत्सवाचे समापन अखेर अनंत चतुर्दशीच्या दिवशी होते. पण काही ठिकाणी गणेश चतुर्थीला कलंक चतुर्थी असेही म्हणतात आणि त्याचं कारण म्हणजे या दिवशी चंद्राकडे पाहणे निषिद्ध असतं. धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीला चंद्राकडे पाहणे निषिद्ध मानलं जातं. आणि जर कोणी या दिवशी चंद्राकडे पाहिले तर त्या व्यक्तीवर खोटे आरोप केले जाऊ शकतात असं म्हणतात. मात्र हे असं का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र का पाहून नये, त्याचं कारण काय ते जाणून घेऊया.
खरंतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्वाचे आहे. चंद्र पाहिल्याशिवाय आणि अर्घ्य अर्पण केल्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होत नाही, उपास सोडला जात नाही. मात्र गणेशोत्सवात, गणेश चतुर्च्या दिवशी मात्र चंद्र पाहण्यास मनाई आहे. गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये, यासंबंधी अनेक कथा धार्मिक शास्त्रांमध्ये वर्णन केल्या आहेत. त्यातील एक कथा जाणून घेऊया.
चंद्र का पाहू नये ?
धार्मिक मान्यतेनुसार, गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्याने एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप किंवा कलंक लागू शकतो. एका आख्यायिकेनुसार, एकदा गणराय हे त्यांच्या वाहनावर, उंदरावर बसून जात होते. वाटेत त्या मूषकाची कोणत्या तरी गोष्टीशी टक्कर झाली, ज्यामुळे गणपती बाप्पाचा तोल गेला आणि ते खाली पडले. हे पाहून चंद्र त्याच्यावर जोरात हसायला लागला.
चंद्राला दिला शाप
मात्र चंद्राचे हे वागणं गणपती बाप्पाला बिलकूल आवडलं नाही आणि चंद्राला हसताना पाहून गणराय त्याच्यावर खूप रागावले. संतापून त्यांनी चंद्र देवाला शाप दिला की चतुर्थीच्या दिवशी जो कोणी चंद्र पाहील त्याला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागेल. असे मानले जाते की एकदा गणेश चतुर्थीच्या दिवशी, भगवान श्रीकृष्णालाही चुकून चंद्र दिसला, ज्यामुळे त्यांच्यावर श्यामंतक मणी चोरल्याचा खोटा आरोप करण्यात आला. श्रीमद् भागवत कथेत असे नमूद करण्यात आलं आहे की भगवान श्रीकृष्णांना त्यांच्यावरील खोट्या आरोपातून सावरण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले.
गणेश चतुर्थीला चुकून चंद्र पाहिला तर काय करावं ?
जर तुम्हाला गणेश चतुर्थीला चुकून चंद्र दिसला तर या दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही हे उपाय करू शकता :-
भगवान श्रीकृष्णाच्या नावाच जप केला पाहिजे.
गणपतीचे
‘सिंह: प्रसेन मण्वधीत्सिंहो जाम्बवता हत: सुकुमार मा रोदीस्तव ह्येष: स्यमन्तक:’ या मंत्राा जप करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)