
हिंदू धर्मात पूजा,व्रत याबद्दल अनेक नियम सांगितले आहेत. शास्त्रानुसार पूजा करण्याबाबत अनेक विधी सांगितल्या आहेत. त्यामागे काहीना काही अर्थ दडलेला आहे. यापैकी एक म्हणजे नेहमी उजव्या हाताने प्रसाद का घ्यावा. त्यामागे अनेक कारणे आहेत, नियम आहेत. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात, परंतु धार्मिक श्रद्धेनुसार ते महत्वाचे मानले जाते.
जीवनात मोठे बदल आणू शकतात
आपल्याला लहानपणी अनेकदा हे घरच्यांनी देखील सांगितलं असेल की, प्रसाद हा नेहमी उजव्या हातातच घ्यावा. प्रसाद हा देवाचा आशीर्वाद असतो आणि तो स्वीकारण्याची पद्धत देखील विशेष असावी. पण अनेकांना यामागील कारण माहित नसेल. पण उजव्या हाताने प्रसाद घेणे किंवा पूजेसंबंधीत असलेले काही नियम, अशा छोट्या गोष्टी देखील आपल्या जीवनात मोठे बदल आणू शकतात. नक्की काय आहे यामागील कारण जाणून घेऊयात.
उजव्या हातानेच प्रसाद का घ्यावा?
हिंदू धर्मात शास्त्रानुसार उजव्या हाताला फार शुभ मानलं जातं. पूजा करणे, देवाला अन्न अर्पण करणे, दिवा लावणे किंवा आरती करणे ही सर्व चांगली कामे उजव्या हाताने केली जातात. उजव्या हाताने काम केल्याने चांगले फळ मिळते असे मानले जाते. जेव्हा आपण पूजा झाल्यानंतर प्रसाद घेतो तेव्हा ते काम देखील पवित्र मानले जाते. म्हणून, प्रसाद हा नेहमी उजव्या हाताने घ्यावा असं सांगितलं गेलं आहे.
डाव्या हाताला अशुभ का मानले जाते?
धार्मिक कार्यासाठी डावा हात चांगला मानला जात नाही. याचे एक मुख्य कारण म्हणजे आपण आपली अनेक दैनंदिन कामे, जसे की शौच किंवा शरीर स्वच्छ करणे, डाव्या हाताने करतो. म्हणूनच ते अपवित्र मानले जाते. शास्त्रांमध्ये असेही लिहिले आहे की डाव्या हाताचा वापर कोणत्याही पवित्र कामात किंवा कोणत्याही धार्मिक कामात, पूजा करताना वापर करू नये.
काही जण डाव्या हाताने देखील प्रसाद घेतात
बऱ्याचदा लोक घाईघाईत किंवा लक्ष नसताना डाव्या हाताने प्रसाद घेतात. हीच सवय पुढे देखील तशीच राहते पण ही सवय टाळली पाहिजे. फक्त एवढंच नाही तर प्रसाद घेण्यापूर्वी हात स्वच्छ ठेवा आणि शक्य असल्यास प्रथम हात जोडून देवाला प्रार्थना करा, पूजा करा आणि त्यानंतर उजव्या हाताने प्रसाद घ्या. असे केल्याने मनालाही शांती मिळते आणि पूजेचे फळही चांगले मिळते.
उजवा हात सूर्य आणि शुभ उर्जेचे प्रतीक
शास्त्रानुसार असा विश्वास आहे की उजवा हात सूर्य आणि शुभ उर्जेचे प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे डावा हात चंद्र आणि लपलेल्या उर्जेशी संबंधित आहे. म्हणून, शुभ कार्यांसाठी उजव्या हाताचा वापर करणे उचित मानले जाते. प्रसादाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. तसेच उजव्या हाताला धार्मिक महत्त्व असल्याने शुभ कार्य हे उजव्या हातानेच केले जातात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)