महिला नंदी मुद्रेत बसून पूजा का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

तुम्ही अनेकदा महिलांना नंदी मुद्रेत बसून पूजा करताना पाहिले असेल. आज आपण महिला नंदी मुद्रेत बसून पूजा का करतात आणि त्याचे महत्त्व काय आहे ते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

महिला नंदी मुद्रेत बसून पूजा का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
Nandi Mudra
| Updated on: Jul 16, 2025 | 10:39 PM

भारतीय संस्कृतीत पूजेला महत्वाचे स्थान आहे. हिंदू धर्मातील प्रत्येक देवाची पूजा केली जाते. तसेच देवांची जी वाहणे आहेत, त्या प्राण्यांचीही मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. या प्रत्येक पूजेमागे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व लपलेले असते. तुम्ही अनेकदा महिलांना नंदी मुद्रेत बसून पूजा करताना पाहिले असेल. आज आपण महिला नंदी मुद्रेत बसून पूजा का करतात आणि त्याचे महत्त्व काय आहे ते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नंदी मुद्रा म्हणजे काय?

नंदी मुद्रा म्हणजे शिवलिंगासमोर बसलेल्या बैलाची मुद्रा होय. अनेकदा महिला किंवा भक्त मंदिरातील शिवलिंगासमोर बैल बसतो त्याच प्रकारे गुडघे वाकवून, हात जोडून आणि डोके झुकवून बसतात या मुद्रेला नंदी मुद्रा म्हणतात. नंदी हा भगवान शंकराचे वाहन आहे.

धार्मिक श्रद्धा

धार्मिक मान्यतेनुसार, नंदी हा केवळ शंकराचे वाहन नाही तर त्यांचा दरबारी आणि सेवक देखील आहे. अशी मान्यता आहे की, जो भक्त नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतो, ती इच्चा नंदी शंकरापर्यंत पोहोचवतो. नंदी शंकराचा दूत म्हणून काम करतो आणि शंकराच्या मूर्तीला भक्तांची भावना पोहोचवतो.

महिला नंदी मुद्रेत पूजा का करतात?

नंदीद्वारे भगवान शंकराकडे आपल्या भावना पोहोचवल्या जातात. महिला नंदी मुद्रेत बसून संतती सुख, सौभाग्य आणि वैवाहिक जीवनात शांतीसाठी प्रार्थना करतात. या मुद्रेतून शंकराकडे लवकर भावना पोहोचतात असे मानले जाते.

भक्ती आणि समर्पणाची भावना

नंदी मुद्रेत बसून भक्त समर्पणाची भावना व्यक्त करतात. नंदीप्रमाणे नतमस्तक होणे हे नम्रता, सेवा आणि भक्तीचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यात महिला सोमवारी उपवास करतात आणि नंदी मुद्रेत बसतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कौटुंबिक सुखासाठी प्रार्थना करतात.

मनोकामना पूर्ण होतात

नंदी मुद्रेत पूजा केल्याने महिलांना नंदीद्वारे आपल्या इच्छा देवाकडे पोहोचल्याची जाणीव होते, त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. महिला वैवाहिक जीवनात सुख आणि शांती आणि संतती प्राप्तीसाठी या मुद्रेत बसून पूजा करतात.

शिवपुराण आणि इतर काही धार्मिक ग्रंथांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, नंदी हा शिवाचा सर्वात जुना आणि सर्वात प्रिय भक्त आहे. तो सतत शिवासमोर असतो, त्यामुळे त्याला शिव द्वारपाल म्हणतात. त्यामुळे जो व्यक्ती नंदीसमोर बसून शंकराची आराधना करतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

टीप: या बातमीत दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही. आम्ही अंधश्रद्धेला पाठिंबा देत नाही.